
भुसावळात ‘डिजिटल अरेस्ट’ च्या नावाखाली सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला वीस लाखांचा गंडा
भुसावळात ‘डिजिटल अरेस्ट’ च्या नावाखाली सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला वीस लाखांचा गंडा
भुसावळ (जळगाव) : डिजिटल युगातील सायबर गुन्ह्यांच्या नवनवीन तंत्रांचा वापर करून नागरिकांना फसवले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भुसावळ येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी सुरेश नथ्थुम धांडे (वय ६९, रा. प्रोफेसर कॉलनी) हे सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीचे बळी ठरले.
१७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत घडलेल्या या प्रकरणात आरोपींनी धांडे यांना अनोळखी मोबाईल नंबर व व्हॉट्सअॅपवर कॉल व व्हिडिओ कॉल करून धमकावले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या आधारकार्डशी मुंबईतील अंधेरी येथील कॉसमॉस बँकेच्या खात्यात २ कोटी ५० लाख रुपये अतिरेक्यांनी पाठवले आहेत.
सायबर गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉलवर धांडे आणि त्यांच्या पत्नीला तातडीने घराचे दरवाजे व खिडक्या बंद करण्यास सांगितले व धमकी दिली, “तुम्हाला आणि तुमच्या मुलाला अटक केली जाईल; विचारल्याशिवाय कॉल बंद करू नका.” या दबावाखाली धांडे यांनी सर्व सूचनांचे पालन केले आणि बँक ऑफ इंडियामधील खात्यातून १९,९५,००० रुपये आरटीजीएसद्वारे लुधियाना येथील सिटी युनियन बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
फसवणूक समजताच धांडे यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम