भुसावळात मोटारसायकल चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; १६ दुचाकी जप्त, दोन अटकेत

बातमी शेअर करा...
भुसावळात मोटारसायकल चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; १६ दुचाकी जप्त, दोन अटकेत
 ८.३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, भुसावळ बाजारपेठ पोलिसांची यशस्वी कारवाई
भुसावळ, १ सप्टेंबर २०२५: भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून झालेल्या मोटारसायकल चोरीच्या तपासात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना अटक करून तब्बल १६ मोटारसायकली जप्त केल्या असून, ८ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

भुसावळ येथील गोसिया नगर येथील रहिवासी अजहरुद्दीन नियाजुद्दीन शेख (वय ३८) यांची हिरो कंपनीची HF डिलक्स मोटारसायकल अज्ञात चोरट्याने २२ ऑगस्ट २०२५ रोजी चोरली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाईला सुरुवात केली.

तपासादरम्यान पोलिसांनी काल्या उर्फ विक्रम केसरसिंग बारेला (वय २०, रा. गारग्या, ता. झिरण्या, जि. खरगोण, म.प्र.) याला शाहपुर (जि. बऱ्हाणपूर) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपला साथीदार राहुल रितेश चव्हाण (वय १८, रा. जयभिम मोहल्ला, शाहपुर, जि. बऱ्हाणपूर, म.प्र.) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत या दोघांनी भुसावळ आणि परिसरातून एकूण १६ मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी पंचनाम्याद्वारे सर्व १६ मोटारसायकली जप्त करून ८ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात हवालदार विजय नेरकर, पोलीस नाईक सोपान पाटील, कर्मचारी योगेश माळी, भुषण चौधरी, प्रशांत सोनार, महेंद्रसिंग पाटील, अमर अढाळे, किरण धनगर, रवींद्र भावसार, सचिन चौधरी, जावेद शहा, हर्षल महाजन आणि योगेश महाजन यांचा सहभाग होता.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम