
भुसावळ स्थानकावर अनधिकृत व्यावसायिकांवर संयुक्त कारवाई
भुसावळ स्थानकावर अनधिकृत व्यावसायिकांवर संयुक्त कारवाई
विजिलन्स व RPF पथकाची संयुक्त प्रतिबंधात्मक तपासणी
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ रेल्वे स्थानकावर बंद करण्यात आलेल्या स्टॉलमधून सुरू असलेल्या अनधिकृत व्यावसायिक क्रियाकलापांवर रेल्वे प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. मध्य रेल्वेचे दक्षता विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांनी दिनांक २९ जुलै २०२५ रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वर (मुंबई एन्ड) ही तपासणी केली.
तपासणीदरम्यान, ४ ते ५ अनधिकृत व्यक्ती PDW (पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर), थंड पेये व आइस्क्रीम इत्यादी विक्री करताना आढळून आल्या. विशेष म्हणजे ही विक्री हिरव्या कपड्यांनी झाकलेल्या बंद स्टॉलमधून सुरू होती. सदर स्टॉल पूर्वीच रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला असल्याचे CCI/BSL यांनी स्पष्ट केले.
RPF व अन्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विक्रेत्यांकडे वैध परवाना मागवण्यात आला. मात्र ते सादर करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे पाच अनधिकृत विक्रेत्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी IPF/BSL यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
घटनास्थळी IPF/BSL, डिप्टी स्टेशन मास्तर (व्यावसायिक), CCI/BSL, SSE/Electrical व CPS/BSL यांना बोलावण्यात आले. कारवाईदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
जप्त केलेला संपूर्ण माल CPS/BSL यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून, कारवाई अहवाल दक्षता विभागाला सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पथकाने नंतर संयुक्त नोंद तयार करून पुढील कारवाईचा प्रस्ताव मांडला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम