
भोलाणेसह परिसरात अवकाळी पावसाने झोडपले -; शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
भोलाणेसह परिसरात अवकाळी पावसाने झोडपले -; शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
प्रतिनिधी पारोळा :-तालुक्यातील भोलाणे, वसंत नगर, पिंपळ कोठे, जिराळी, जामदे, सह परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून संततधार अवकाळी पाऊस चालू असतानाच काल दि. ३० रोजी सायंकाळी ४:०० वाजेच्या सुमारास अति मुसळधार अवकाळी पावसाने आकर्षा झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथील शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील भोलाणे वसंत नगर सह परिसरात मागील तीन चार दिवसांपासून संततधार पाऊस चालू असतानाच गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या अतिवृष्टी मुळे शेतातील वेचणीला आलेला कापुस पार भिजुन गेले आहे. तसेच काढणीसाठी जमा करून ठेवलेला मका, ज्वारी, बाजरी पिकांची कोंब फुटून पार खराब झाली आहे. या अतिवृष्टी असा अस्मानी संकटामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना उपासमारी व कर्जामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
त्याअनुषंगाने आज रोजी भोलाणे, वसंत नगर सह परिसरातील शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा त्वरित सरसकट पंचनामा करण्यात येऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी याबाबत पारोळा तहसीलदार डॉ उल्हास देवरे, तालुका कृषी अधिकारी, यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांकडून प्रशासनास विनंती व इशारा देण्यात आले आहे की, लवकरात लवकर अतिवृष्टी झालेल्या गावातील शेती व शेतपिकांचे पंचनामे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
मागील महिन्यात शासनाने काढलेल्या अतिवृष्टी नुकसानीच्या जीर मध्ये पारोळा तालुक्यातील पण अमळनेर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ४२ खेड्याचे नाव शासनाने जीर मधून वगळले होते. त्याबाबत येथील लोक प्रतिनिधी आमदार साहेब मा. अनिल भाईदास पाटील यांनी या ४२ खेड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी बद्दल कोणताही पाठपुरावा केला नाही. आमदार साहेब फक्त या ४२ खेड्यात मत मागायला आले होते. त्यानंतर साहेबांनी या गावात आतापर्यंत तोंडही दाखवले नाही. असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा यासाठी लोकप्रिय आमदार साहेब यांनी शासनास व कृषी अधिकारी यांना सुचना कराव्या अशी मागणी आज रोजी दिलेल्या निवेदनात भोलाणे, वसंतनगर सह परिसरातील शेतकरी करत आहेत.
सदर निवेदन देताना शेतकरी युवराज पाटील, अरुण पाटील, कांतीलाल करंजे, ईश्वर पाटील, शाम जाधव, दिनकर पाटील, भुषण पाटील, दिनेश जाधव, प्रविण पाटील, अरविंद जाधव, उत्तम जाधव, सह मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम