मंगरूळ येथे विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाचा थरारक बचाव

तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले

बातमी शेअर करा...

मंगरूळ येथे विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाचा थरारक बचाव

तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले

अमळनेर | प्रतिनिधी

तालुक्यातील मंगरूळ येथे मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाचे प्राण तेथील धाडसी तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले. या साहसपूर्ण कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, मंगरूळ येथील कैलास देवचंद पाटील यांच्या विहिरीवर पाणी घ्यायला गेलेल्या कल्पेश पाटील यांना अंदाजे सात ते आठ महिने वयाचे हरणाचे पिल्लू पाण्यात पडून धडपडताना दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती सरपंच समाधान पारधी यांना दिली. सरपंचांनी त्वरित तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना कळवले आणि त्यांनी वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी पाठवले.

वनविभागाच्या पथकाच्या आगमनापूर्वीच, स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी भूषण मधुकर भदाणे आणि धनंजय हिलाल पाटील यांनी कोणतीही भीती न बाळगता विहिरीत उडी घेतली. विहिरीत खोल पाणी असल्याने आणि कठडे मोडकळीस आल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. मात्र, दोघांनी हरणाच्या पिल्लाला सुखरूप पकडले.

तोपर्यंत सरपंच समाधान पारधी, दिनेश पाटील, अशोक गोकुळ पाटील, शुभम धनगर, अनिल चव्हाण, कल्पेश पाटील, राजेंद्र पाटील, विठ्ठल पाटील यांनी तीन दोर विहिरीत टाकले. हरणाच्या पिल्लाला एका दोराने बांधून वर ओढण्यात आले आणि इतर दोरांच्या साहाय्याने दोन्ही तरुणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

हरीण पडल्याने आणि धडपड केल्याने त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. वनरक्षक पी. जे. सोनवणे, रामदास वेलसे, वनमजूर मयूर पाटील, समाधान पाटील यांनी पिल्लाला त्वरित पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. डॉ. संदेश वाटोळे यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला जंगलात सुखरूप सोडले.

याच दरम्यान, तालुक्यातील आमोदा येथेही एका विहिरीत मच्छींद्र ताथुराम पाटील यांच्या शेतात दोन ते तीन महिन्यांचे हरणाचे पिल्लू पडले होते. मात्र, दोन-तीन दिवसांपासून पाण्यात अडकून धडपड केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. उन्हाळ्यामुळे पाण्याच्या शोधात हरणे शिवारात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वनविभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की शेतात पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच विहिरींना कठडे किंवा झाकण बसवावे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.

पी. जे. सोनवणे, वनरक्षक, अमळनेर

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम