
मंत्री गिरीश महाजन व कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांच्या सोबत महत्त्वपूर्ण कृषी बैठक
मंत्री गिरीश महाजन व कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांच्या सोबत महत्त्वपूर्ण कृषी बैठक
बांबू लागवडीसह शेतकरी कंपन्यांच्या स्थापनेवर भर
जामनेर प्रतिनिधी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. पाशा पटेल यांनी आज जामनेर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते व आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यानिमित्त आयोजित बैठकीत जामनेर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील संधी, अडचणी आणि नवकल्पनांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीत बांबू लागवडीस विशेष महत्त्व देण्यात आले. पाशा पटेल यांनी सांगितले की, बांबू ही भविष्याची शेती असून ती पर्यावरणपूरक, अल्पपाण्यावर जगणारी व उत्पन्नदायक आहे. त्यामुळे खाजगी शेतजमिनींसोबतच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या तसेच शासकीय मोकळ्या जमिनींवर बांबू लागवडीस प्राधान्य देण्यात यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, राज्य शासनामार्फत बांबू लागवडीसाठी प्रतिहेक्टर अनुदान दिले जाते, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा यासाठी प्रशासकीय सहकार्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना पाशा पटेल यांनी “शेतकऱ्यांनी ‘फार्मर प्रोड्युसर कंपनी’ (FPC) स्थापन करून एकत्रितपणे शेतीमाल उत्पादन, प्रक्रिया व विक्री यामध्ये सहभागी व्हावे,” असे ठामपणे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि शाश्वत शेतीस चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
बैठकीत तालुक्यातील कृषी विकास, बाजारपेठांशी थेट संपर्क, शाश्वत सिंचन व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योग यासंदर्भातील योजनांवरही चर्चा झाली.
या बैठकीस तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील, यांच्यासह अनेक शेतकरी नेते, ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषी तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“बांबू लागवडीतून उत्पन्न वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देता येईल. शेतकरी आत्मनिर्भर व्हावा यासाठी शासन कटिबद्ध आहे.” — मा. पाशा पटेल
“शेतकऱ्यांना नव्या दिशा आणि आधुनिक साधने उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. जामनेर तालुक्यात कृषी विकासाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” — मा. ना. गिरीशभाऊ महाजन

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम