
मतदानासाठी भरपगारी सुट्टी अनिवार्य
मतदानासाठी भरपगारी सुट्टी अनिवार्य
कामगारांना मतदान सवलतीसाठी नोडल अधिकारीचीं नियुक्ती
जळगाव प्रतिनिधी लोकशाही पद्धतीचे संरक्षण आणि प्रत्येक मतदारास मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १२५ (बी) नुसार निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदारांना भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य असून, जळगाव जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्देश जारी केले आहेत.
अलीकडील निवडणुकांमध्ये काही खाजगी संस्था, दुकाने, औद्योगिक आस्थापना व व्यावसायिक प्रतिष्ठान आपल्या कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा किमान सवलत न देत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने सक्त कारवाईची भूमिका घेतली आहे. मतदानापासून वंचित राहणे हे लोकशाहीसाठी घातक असून, सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सुलभ वातावरण निर्माण करणे हे सर्व नियोक्त्यांचे कर्तव्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
शासन निर्णयास अनुसरून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी डॉ. रा. दे. गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त, जळगाव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे तर सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून जितेंद्र पवार, दुकाने निरीक्षक श्रेणी-२ (मो. ९८६०८९८४८४) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुट्टी किंवा मतदानासाठी आवश्यक सवलत न मिळाल्यास संबंधितांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालय, पहिला मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव येथे अथवा सहाय्यक नोडल अधिकारी पवार यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम