मतदार यादीतील गोंधळ वाढला; चुकीच्या प्रभागातील नावे पाहून नागरिक संतप्त

बातमी शेअर करा...

मतदार यादीतील गोंधळ वाढला; चुकीच्या प्रभागातील नावे पाहून नागरिक संतप्त

अनेक प्रभागांतील हजारो मतदारांना प्रभागांतराचा फटका; तक्रारींचा ढिग वाढला

जळगाव : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील विसंगती गुरुवारी आठव्या दिवशीही कायम राहिली. मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकल्याचा मोठा गोंधळ उफाळून आल्याने नागरिकांनी तक्रारी आणि हरकतींचा अक्षरशः पाऊस पाडला. एकट्या दिवसभरात तब्बल १ हजार ९६७ मतदारांनी वैयक्तिक हरकती नोंदवताना १०५ तक्रार अर्ज नागरिकांनी चुकीच्या नोंदींबाबत सादर केले.

दि. २० रोजी महापालिकेकडून प्रभागनिहाय प्राथमिक याद्या प्रसिद्ध झाल्या असून दि. ३ डिसेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर दि. १० डिसेंबरपर्यंत आयुक्तांकडून सर्व हरकतींवर निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र प्रारूप याद्यातील चुकीच्या नोंदींमुळे अनेकांना आपल्या नावांची योग्य प्रभागात पुनर्स्थापना करण्यासाठी वारंवार महापालिकेची धाव घ्यावी लागत आहे.

या गोंधळाचा फटका अनेक कुटुंबांनाही बसला असून पूर्ण कुटुंबाची नावेच अनोळखी प्रभागात ढकलल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मतदानहक्कावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने संतापही वाढत आहे.

दरम्यान, वाढत्या हरकतींना पाहता आयोगाने नागरिकांना दिलासा देत हरकती दाखल करण्याची मुदत सहा दिवसांनी वाढवली आहे. पूर्वी २० ते २७ नोव्हेंबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती नोंदवण्याची मर्यादा होती. मात्र आता दि. ३ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती मांडण्याची सुविधा दिल्याने नागरिकांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

मतदार यादीतील या सर्व गोंधळामुळे प्रभागनिहाय कार्यालयांमध्ये गर्दी वाढली असून निवडणूक पूर्वतयारीतील हा प्रशासकीय विस्कळीतपणा नागरिकांमध्ये चर्चेचा प्रमुख विषय ठरू लागला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम