
मतदार याद्यांतील गोंधळाचा उच्चांक
मतदार याद्यांतील गोंधळाचा उच्चांक
सहाव्या दिवशी तब्बल २ हजार हरकती; २५० तक्रारी दाखल
जळगाव – महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे नागरिक त्रस्त झाले असून सहाव्या दिवशी हरकतींनी नवा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी एकट्याच दिवशी २,०२३ हरकती आणि २५० तक्रारी दाखल झाल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महानगरपालिकेने प्रारूप याद्या जाहीर केल्यानंतर सुरुवातीपासूनच मतदारांच्या नावांची चुकीची नोंद, प्रभाग बदल, तसेच एकाच कॉलनीतील मतदार वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. विशेषतः प्रभाग क्रमांक १० आणि १८ मध्ये दोन ते तीन हजारांहून अधिक मतदारांची नावे शेजारच्या प्रभागात स्थलांतरित झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदारांसह इच्छुक उमेदवारांचीही मोठी दमछाक होत आहे.
अनेक कॉलन्यांतील नागरिकांचे नावे चुकीच्या प्रभागात गेल्याने योग्य उमेदवाराला मतदान करण्याचा हक्कच धोक्यात आला आहे. दुरुस्ती तातडीने न झाल्यास मोठ्या संख्येने मतदारांना आपल्या प्रभागातील उमेदवाराला मतदान करता येणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
हरकतींची नोंद – दिवसनिहाय
२० नोव्हेंबर – ०३
२१ नोव्हेंबर – ४०
२२ नोव्हेंबर – ३६२
२३ नोव्हेंबर – ७२७
२४ नोव्हेंबर – २१०८
२५ नोव्हेंबर – २०२३
तक्रारींची नोंद – दिवसनिहाय
२२ नोव्हेंबर – १०५
२४ नोव्हेंबर – ४५०
२५ नोव्हेंबर – २५०
प्रारूप मतदार याद्यांतील गोंधळामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये, यासाठी नागरिकांनी वेळेत हरकती दाखल केल्या असून, मनपा प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम