मनपावर महायुतीचाच झेंडा फडकणार

बातमी शेअर करा...

मनपावर महायुतीचाच झेंडा फडकणार
७५ पैकी ६५ जागा महायुतीकडे येणार; गिरीश महाजनांचा  दावा
जळगाव प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती निश्चित असून, येत्या निवडणुकीत ७५ पैकी तब्बल ६५ जागा महायुतीच्या ताब्यात येतील, असा ठाम विश्वास संकटमोचक मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
मंत्री महाजन म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, राष्ट्रवादी काँग्रेससोबत अद्याप काही बाबींवर बोलणी बाकी आहेत. उद्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. महायुतीबाबतचा अंतिम निर्णय व अधिकृत घोषणा उद्याच केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे ५७ तर शिवसेनेचे १८ नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र दोन्ही पक्ष परस्पर तडजोडीस तयार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला ५ ते ८ जागा देण्यावर प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवताना उमेदवारांची जिंकण्याची क्षमता, स्थानिक राजकीय समीकरणे आणि संघटनात्मक ताकद या निकषांवर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महायुतीमुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र योग्य वेळी सर्वांचे पुनर्वसन केले जाईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, असा दिलासाही मंत्री महाजन यांनी दिला. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून निवडून आलेले, मात्र नंतर बंडखोरी करून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देऊ नये, असा भाजपचा स्पष्ट आग्रह असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांबाबत भाजपाची भूमिका कठोर राहील, असे संकेतही त्यांनी दिले.
जळगाव महानगरपालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार असून, या निवडणुकीसाठी भाजपकडून तब्बल ६०० इच्छूक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. महायुतीचा अंतिम निर्णय होताच उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
एकूणच, जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा भाजपचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला असून, उद्याच्या निर्णायक बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम