मनपा निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात

बातमी शेअर करा...

मनपा निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात

२३ ते ३० डिसेंबरदरम्यान अर्ज स्वीकृती; २५ व २८ रोजी शासकीय सुटी

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अधिकृतरीत्या वाजले असून आज, मंगळवारपासून नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. इच्छुक उमेदवारांना दि. २३ डिसेंबर ते दि. २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत, तर दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज स्वीकृत केले जाणार आहेत. मात्र दि. २५ डिसेंबर व दि. २८ डिसेंबर रोजी शासकीय सुटी असल्याने या दोन दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
दरम्यान, दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार असून छाननी पूर्ण होताच वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी तत्काळ प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर दि. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून त्याच दिवशी अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. यानंतर दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. अखेर दि. १९ जानेवारी रोजी शासन राजपत्रात निवडणूक निकाल अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम