
मनोज चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश; दहा वर्षांनी राजकारणात पुनरागमन
मनोज चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश; दहा वर्षांनी राजकारणात पुनरागमन
जळगाव (प्रतिनिधी) :
जळगाव महापालिकेच्या दोन टर्ममध्ये ठसा उमठवणारे माजी नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात उडी घेत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चालना दिली आहे.
भाजपचे बळ वाढवणारा पक्षप्रवेश
चौधरी यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी केवळ नेतृत्वपुरता मर्यादित नसून, शहराच्या राजकारणात भाजपची पकड मजबूत करण्यासाठी हा एक निर्णायक टप्पा ठरू शकतो. त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि जनसंपर्काच्या जोराचा पक्षाला निश्चितच फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.
गेल्या दशकात सक्रियतेपासून अलिप्तता, आता पुनरागमन
मनोज चौधरी यांनी यापूर्वी दोन पंचवार्षिक काळात नगरसेवक म्हणून कार्य केले असून स्वच्छ प्रतिमा व लोकाभिमुख कार्यपद्धती यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. त्यांनी एकदा विधानसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यात यश न मिळाल्याने काही काळ राजकारणापासून अलिप्त राहिले होते. सध्या ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
ब्राह्मण सभागृहात प्रवेश सोहळा, मान्यवरांची उपस्थिती
या प्रवेश सोहळा आज ब्राह्मण संघ सभागृहात पार पडला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू मामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष नंदू महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राजकीय समीकरणांना नवे वळण
चौधरी यांचा भाजपप्रवेश जाहीर झाल्यानंतर जळगाव शहरात नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचा प्रभाव मोठा असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या रणनीतीत ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असे संकेत मिळत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम