
कॉल सेंटर प्रकरणात दोन मुख्य संशयित मुंबईतून जेरबंद; अटक संख्या दहावर
कॉल सेंटर प्रकरणात दोन मुख्य संशयित मुंबईतून जेरबंद; अटक संख्या दहावर
जळगाव (प्रतिनिधी) – माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील एल. के. फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत दोन मुख्य संशयितांना मुंबईतून जेरबंद केले आहे. आदील सैयद निशार अहमद सैयद (३२, रा. ओशिवरा, मुंबई) आणि अकबर खान रौनक अली खान (४०, रा. मालाड पूर्व, मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून या कारवाईनंतर प्रकरणातील एकूण अटक संख्या १० वर पोहोचली आहे.
ममुराबाद रस्त्यावरील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर सुरू असलेले हे कॉल सेंटर विदेशातील नागरिकांना आकर्षक अमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवत होते. पोलिसांनी पूर्वीच छापा टाकून कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक केली होती. या कॉल सेंटरमधून बनावट ऑफर, गुंतवणूक योजनेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले होते.
मुंबईतील फ्लॅटवर छापा; दोघेही सतत ठिकाण बदलून राहत होते
गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रात्री एलसीबी व डीवायएसपी पथकाने मुंबईतील एका फ्लॅटवर छापा टाकून आदील आणि अकबर या दोघांना ताब्यात घेतले. हे संशयित पोलीसांच्या नजरेतून बचावण्यासाठी वारंवार ठिकाण बदलत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या प्रकरणातील आणखी एक मुख्य संशयित ऋषी उर्फ केशव राजू बेरिया (रा. मुंबई) फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघांना शनिवारी (२२ नोव्हेंबर) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपास अधिकारी नितीन गणापुरे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. चौकशीत इम्रान नावाच्या आरोपाला या दोघांनी एक लाख रुपये दिल्याचे उघड झाले असून ती रक्कम कोठून आली, स्क्रिप्ट तयार करून विदेशातील नागरिकांना कसे कॉल केले जात होते, आंतरराष्ट्रीय रॅकेटचे जाळे कसे काम करते तसेच माजी महापौर ललित कोल्हे यांच्याशी त्यांची ओळख कशी झाली याबाबत तपास आवश्यक असल्याचे न्यायालयात मांडण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम