महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांची प्रासंगिकता या विषयावरसमूह चर्चेचे आयोजन

बातमी शेअर करा...

महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांची प्रासंगिकता या विषयावरसमूह चर्चेचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विद्यापीठातील विचारधारा प्रशाळे अंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्रच्या वतीने विचारधारा प्रशाळेच्या सभागृहात महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांची प्रासंगिकता या विषयावरसमूह चर्चेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे,तर विचार मंचावर महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्राच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. पवित्रा पाटील, स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. अतुल बारेकर तसेच विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांची प्रासंगिकता या विषयावर आपआपली मते मांडली. यात संशोधक विद्यार्थी महेश सूर्यवंशी याने सांगितले की, १८६८ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेल्या असतांना येथील अस्पृश्य समाजाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता त्यावेळी महात्मा फुलेंनी त्यांची विहीर अस्पृश्य समाजाला उपलब्ध करून दिली होती. इतकी भीषण जातीयता त्यावेळी होती त्याप्रमाणेच आजच्या काळातही राजस्थान मध्ये एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला शाळेतील पाणवठ्यातून पाणी पिल्याने तेथील शिक्षकाने जातीय द्वेषातून त्याला गंभीर स्वरुपात मारले अशा घटना आजच्या काळातही घडलेल्या आहेत. त्यानंतर डॉ. सुदर्शन भवरे हेम्हणाले की, एका विशिष्ट्य समाजाची मक्तेदारी मोडीत काढण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केलेले आहे. सर्वांना शिक्षण मिळावे हा महात्मा फुलेंचा मूलतः हेतू होता. व इथल्या भ्रमिष्ट धर्मव्यवस्थेवर प्रहार करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.डॉ. प्रीती सोनी यांनी महिलांच्या उन्नतीच्या मागे सर्वात मोठ कार्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे असल्याचे नमूद केले. त्याचसोबत प्रा. कृष्णा संदानशिव यांनी माणसाचा सत्य हाच एक धर्म असावा ज्योती म्हणे याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी महिला शिक्षण, अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद अशा अनेक कार्यांतून समाजात क्रांती घडवून आणली.

महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्राच्या विभाग प्रमुख डॉ. पवित्रा पाटील यांनी सांगितले की, समाजामध्ये समानता असावी. महात्मा ज्योतिबा फुले या क्रांतीसूर्यामुळे खऱ्या अर्थाने मी वर्तमान स्थितीतील या पदावर कार्यरत आहे असे बोलून त्यांनी फुलेंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विचारधारा प्रशाळेचे अध्यक्ष प्रा. डॉ. म. सु. पगारे हे सदर समूह चर्चेच्या मागील हेतू सांगतांना म्हणाले की, सखोल निष्कर्षा पर्यंत पोहोचण्यासाठी समूह चर्चा आयोजित केल्या जात असतात. या माध्यमातून सत्यान्वेषी विचार मांडतांना प्रज्ञेचा प्रवास होत असतो. महात्मा फुलेंचे संपूर्ण साहित्य अभ्यासतांना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, महात्मा फुले यांनी ब्राम्हण समाजाला विरोध केलेला नसून ब्राम्हणी प्रवृत्तीला विरोध केलेला आहे. श्रेष्ठ आणि कनिष्ठ ह्या दऱ्या निर्माण करणाऱ्या ब्राम्हण्यग्रस्त असलेल्या प्रवृत्तीला त्यांचा विरोध होता. याच सोबत प्रकर्षाने आपण हे ही समजून घेतले पाहिजे की, महात्मा फुलेंनी फक्त दलित, अस्पृश्य समाजासाठीच कार्य केलेले नसून त्यांनी ब्राम्हण समाजातील स्त्रीयांना शिक्षणाची दारे उघडली तसेच अनिष्ठ रूढींना देखील विरोध केला. विधवा ब्राम्हण महिलेंच्या केशवपणालात्यांनी विरोध केला. बहुआयामी असे महात्मा फुलेंचे कार्य आहे. त्यांनी केलेला थेट प्रश्न हा महत्वाचा आहे. श्रेष्ठ व कनिष्ठपणा जात, धर्मावर आधारित नसावी. गुणसंपन्नता, शीलसंपन्नता, सदाचरण तसेच समाजसेवेची तळमळ महात्मा फुलेंमध्ये होती. त्यामुळे आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करतांना आपण स्वतःला आनंदी, समाधानी व धन्य मानले पाहिजे. असे यावेळी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. दीपक खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र नाईक याने केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम