
महापालिकेच्या ४३६ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ
.महापालिकेच्या ४३६ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ
नवीन वेतनश्रेणीमुळे कर्मचाऱ्यांत उत्साह; अपात्र ठरलेल्यांची संख्याही लक्षणीय
जळगाव : महापालिका कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून, ४३६ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये २२१ कर्मचाऱ्यांना पहिली तर २१५ कर्मचाऱ्यांना दुसरी पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे त्यांच्या वेतनात सुधारणा होणार असून, मनपा कर्मचाऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.
महापालिकेच्या आस्थापना विभागाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत कार्यरत असलेल्या गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केली. पात्रतेच्या निकषांनुसार २२१ जण पहिल्या टप्प्यात, तर २१५ जण दुसऱ्या टप्प्यात पदोन्नतीस पात्र ठरले.
तथापि, अद्याप ४४८ कर्मचारी काही कारणास्तव अपात्र ठरले असून, त्यामध्ये ३२४ कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्याचे समोर आले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन संबंधितांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम