
महामार्गावरील शोरुम फोडणारे चोरटे अखेर जेरबंद !
नशिराबाद पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई
महामार्गावरील शोरुम फोडणारे चोरटे अखेर जेरबंद !
नशिराबाद पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई
जळगाव: प्रतिनिधी ;- शहराजवळील महामार्गावर असलेल्या चौधरी टोयोटा आणि सातपुडा ऑटोमोबाईल या नामांकित चारचाकी शोरूममध्ये झालेल्या तोडफोड व चोरीप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मध्यप्रदेशातून आलेल्या चोरट्यांनी ही चोरी केल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
गेल्या महिन्यात जळगाव-भुसावळ मार्गावर असलेल्या या शोरुममध्ये चोरट्यांनी प्रवेश करून धुडगूस घातला होता. मोठ्या रकमेचे नुकसान करूनही त्यांच्या हाती फारसा मुद्देमाल लागला नव्हता. तरीही त्यांनी शोरुममध्ये तोडफोड करत लाखोंचा आर्थिक फटका बसवला.
या प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सपोनि ए.सी. मनोरे यांना गुप्त माहिती मिळाली की ही चोरी मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगारांनी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत खंडवा येथे धडक कारवाई केली आणि मेवालाल पिसीलाल मोहिते (३३, बोरगाव, मध्यप्रदेश), कमलेश उर्फ कालू मन्नलाल पवार (४०, रोसिया, जि. खंडवा), अजय धुलजी चव्हाण (२२, घटिया गराठे, मनसौर) यांना अटक केली.
पोलिसांचे पोहेकॉ योगेश वराडे, युनूस शेख, गिरीश शिंदे, पोकॉ आरिफ तडवी या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली. या टोळीवर यापूर्वीही अनेक ठिकाणी चोरीचे आरोप असल्याचे समोर आले आहे.
महामार्गावरील मोठ्या शोरूमवर धाडसी हल्ला करणाऱ्या या चोरट्यांचा पोलिसांनी तत्परतेने छडा लावला. ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल नशिराबाद पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू असून, या टोळीशी संबंधित आणखी काही आरोपी असल्याची शक्यता आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम