
महामार्गावर तोतया पोलिसाची दहशत
वाहनचालकाला शिवीगाळ करून फोटो काढण्याचा प्रयत्न
जळगाव: प्रतिनिधि
महामार्गावर स्वतःला पोलिस असल्याचे भासवून वाहनचालकांना त्रास देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या या प्रकारामुळे महामार्गावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
जयेश खुमानसिंग ठाकूर (वय ४३, रा. व्यंकटेश कॉलनी) हे कारने प्रवास करत असताना महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे थांबले होते. त्याच वेळी, (MH 19 CK 5747) क्रमांकाच्या दुचाकीवरील एका इसमाने त्यांच्या गाडीसमोर दुचाकी आडवी लावली. हातात पोलिसांची काठी घेतलेल्या या इसमाने स्वतःला पोलिस असल्याचा बनाव करत ठाकूर यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, त्याने त्यांच्या कारचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
ठाकूर यांनी त्याला प्रश्न विचारताच, दुचाकीस्वाराने स्वतःला भाजप पदाधिकारी असल्याचे सांगितले. मात्र, कोणतेही स्पष्ट उत्तर न देता तो घटनास्थळावरून निघून गेला.
या प्रकरणी ठाकूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी या इसमाचे नाव मनोहर बाविस्कर (रा. खोटेनगर) असल्याचे निष्पन्न केले. हा इसम पूर्वीपासूनच महामार्गावर अशा प्रकारे वाहनचालकांना त्रास देत होता, मात्र कोणीही अधिकृत तक्रार दाखल केली नव्हती.
ठाकूर यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. महामार्गावर अशा प्रकारे खोट्या पोलिसांच्या दहशतीमुळे वाहनचालक त्रस्त होत असल्याने, नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम