
महायुतीचा ‘विजयाचा चौकार’; शिवसेना शिंदे गटाची घोडदौड कायम
महायुतीचा ‘विजयाचा चौकार’; शिवसेना शिंदे गटाची घोडदौड कायम
प्रभाग ९ ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख बिनविरोध; सलग तिसऱ्या यशाने शिवसेनेत उत्साह
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीची विजयी लाट अधिकच मजबूत होताना दिसत आहे. डॉ. गौरव सोनवणे आणि मनोज चौधरी यांच्या बिनविरोध निवडीनंतर आता प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधून शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे महापालिकेत महायुतीचा चौथा, तर शिवसेना शिंदे गटाचा सलग तिसरा उमेदवार निर्विरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात महायुतीचे वर्चस्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे.
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने अत्यंत काटेकोर नियोजनासह जोरदार मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ (अनुसूचित जमाती राखीव) मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड आधीच निश्चित झाली होती. या जागेवर उद्धवसेनेचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने डॉ. गौरव सोनवणे यांचा विजय निर्विवाद ठरला.
यानंतर प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मधून शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे चौधरी यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली. या यशानंतर शिवसेनेची घोडदौड सुरूच राहिली. दुपारी प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधील चित्र स्पष्ट झाले. येथील अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
सलग तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, महापालिका परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
दरम्यान, महायुतीतील भाजपनेही आपले विजयी खाते आधीच उघडले आहे. भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून बिनविरोध निवड झाली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत महायुतीचे एकूण चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरता विजयी ठरले असून, प्रत्यक्ष मतदानाआधीच महायुतीने जळगाव महापालिकेत मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम