
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता
पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा येलो अलर्ट
मुंबई l प्रतिनिधी
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यांत राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली आणि मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. नुकसानीतून सावरत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट आल्याने शेतकरी आणि नागरिक दोघेही चिंतेत आहेत.
हवामान विभागाचा अंदाज आणि अलर्टची माहिती :
🔸 २१ ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट.
🔸 २२ ऑक्टोबर: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यांना येलो अलर्ट.
🔸 २३ ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा.
🔸 २४ ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट.
🔸 २५ ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि संपूर्ण विदर्भ भागात येलो अलर्ट जारी.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आपले कापूस, सोयाबीन आणि उर्वरित खरीप पीक सुरक्षित ठिकाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना वीज कोसळण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम