
महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे उद्घाटन
महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी माणूस म्हणून अव्वल असलं पाहिजे. केवळ स्त्री आणि पुरूष या द्वंदामध्ये न अडकता प्रत्येकाने आपले ध्येय साध्य करावे.विद्यार्थ्यांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध झाल्याने मिळालेल्या संधीचं सोनं कराव असे मत ‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिध्द अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.विजय फुलारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कारभारी काळे, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्य.प. राजेंद्र नन्नवरे, राजभवनद्वारा नियुक्त निरीक्षण समितीचे डॉ. संदीप हाडोळे, वित्त समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास अंभुरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नितीन झाल्टे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. महेंद्रसिंग रघुवंशी, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. एस.एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील, प्रा. सुरेखा पालवे, राजभवन निरीक्षण समिती सदस्य डॉ.विजय कुंभार, डॉ. राजेंद्र माळी,वित्त समिती सदस्य डॉ. राजीव कटारे, डॉ. धनाजी जाधव, डॉ. राजेश लिमसे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, युवक महोत्सवाचे माजी कार्याध्यक्ष दिलीप पाटील, प्रा. ए.एम. महाजन, दिपक पाटील, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी विकास संचालक डॉ. सुनील पाटील, आयोजन समितीचे सचिव व विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्रेया बुगडे यांनी युवक महोत्सवामधूनच ऊर्जा मिळत असल्याचे सांगत आई – वडिलांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना अभिमान वाटेल असे आयुष्य जगण्यासाठी ध्येय ठेवायला पाहिजे. आपण आपल ध्येय ठरवले तर प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या डिजीटल युगात विद्यार्थ्यांना हव्या त्या क्षेत्रात करीअर करता येईल परंतु तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा त्यात अव्वलस्थानी रहा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. ‘मी कोण आहे याचा शोध मी केव्हाच थांबवलाय माझ लक्षात आलय की म्हणजे सृष्टीनेनिर्माण केलेल सुंदर फुल नाही तर मीच आहे संपुर्ण सृष्टी, मीच आहे आभाळ, मीच आहे कृष्णकांत’ ही चारोळी सादर करून ज्येष्ठ सिने अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि सई ताम्हणकर यांची मिमिक्री करतांना उपस्थितांची फर्माईश पूर्ण केली.
सुरुवातीस स्वागतपर भाषणात व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी युवक महोत्सवाच्या वंदे मातरम@१५० या थीम संदर्भात संकल्पना स्पष्ट करत इंद्रधनुष्याच्या माध्यमातून अनेक प्रतिभावंत कलावंत प्रतिभेच्या प्रांतामध्ये नाव गाजवत आहेत. या महोत्सवात विद्यार्थ्यांना देखील नाव गाजवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आपल्या प्रतिभेचा उपयोग समाजाच्या प्रबोधनासाठी, राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि राष्ट्राच्या जागरणासाठी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली.
कुलगुरू प्रा. कारभारी काळे म्हणाले भारत हा तरूणांचा देश आहे. त्यामुळे तरूणाईवर मोठी जबाबदारी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात कला जोपासावी हाच खरा अविष्कार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आपण मशिनीष्ट झालो आहोत अशा इंद्रधनुष्य महोत्सवातून आनंद मिळतो.
कुलगुरू प्रा.विजय फुलारी यांनी इंद्रधनुष्य आयोजना मागे तरूणांच्या अविष्काराचा फायदा व्हावा असे सांगून विद्यार्थ्यांनी कठोर परीश्रम करून या महोत्सवात नैपुण्यता दाखवाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी ‘हर फैसला नही होता सिक्का उछालके यह दिल का मामला है, जरा संभालके, इस मोबाईल के जमाने मे उनको क्या मालूम हम खत मे रख देते थे दिल किताब मे’ हा शेर ऐकवून आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, वंदे मातरम हे गीत नव्हे तर राष्ट्राच्या, ऐक्याचे व शौर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी संधीचे सोनं करा, कौशल्य आत्मसात करा, विकास करा आणि देशाच्या विकासासाठी योगदान द्या असे आवाहन त्यांनी केले. इंद्रधनुष्य महोत्सव हा केवळ उत्सव नाही तर हा कला, ऊर्जा आणि सर्जनशीलतेचा संगम असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुणांनी एक कायम लक्षात ठेवले पाहिजे की, परिश्रमाला पर्याय नाही, यशस्वी व्हायचे असेल तर त्याला शॉर्टकट नाही असे सांगून बहिणाबाईंच्या ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर ….!’ या कवितेच्या ओळी ऐकविल्या. भाषणाच्या सुरवातीस त्यांनी विद्यापीठाचा प्रगतीचा आढावा मांडला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून इंद्रधनुष्य-२०२५ चे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. योगेश महाले, डॉ. रफिक शेख व खेमराज पाटील यांनी केले. आभार कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी मानले.
विद्यापीठ युवक महोत्सवाचे माजी कार्याध्यक्षांचा गौरव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात यापुर्वी झालेल्या युवक महोत्सवात कार्याध्यक्ष म्हणून कार्य करणारे माजी कार्याध्यक्ष दिलीप पाटील, प्रा. ए.एम. महाजन, दिपक पाटील, राजेंद्र नन्नवरे, नितीन झाल्टे यांचा कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
शोभायात्रेत विविधतेचे दर्शन : एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवाच्या उद्घटनापूर्वी विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनापासून ते मुख्य प्रवेशद्वार आणि तिथून प्रशासकीय इमारतींपर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विविधतेचे दर्शन घडून आले. शोभायात्रेचे उद्घाटन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले.
वंदे मातरम् या गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याने वंदे मातरम@१५० या थीमवर आधारीत राज्यभराती सहभागी झालेल्या २४ विद्यापीठाच्या संघांनी सहभाग नोंदविला. शोभायात्रा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर आल्यानंतर सहभागी संघानी विविध लोककला आणि परंपरेचे सादरीकरण केले. यामध्ये वंदे मातरम, जय जय महाराष्ट्र, देशभक्ती, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारूड, आदिवासी नृत्य व संस्कृती, विकसित भारत, गारद, खान्देशातील लोकसंस्कृती, गोंधळ, पर्यावरण, मतदान जनजागृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा,विदर्भातील थोर रत्ने, कोकणातील दशवतार, जत्रा संस्कृती, वारकरी संस्कृती, नारी शक्ती, आरोग्य जनजागृती, राष्ट्रीय एकत्मता, संस्कृत प्रसार, ढोल ताशा लेझीम असे विविध विषयांवर कलांचे अविष्कार सादर करण्यात आले. त्याकरीता कलावंतविद्यार्थ्यांनी त्यांच्या विषयाला साजेशी वेशभूषा, वाद्यवृंद व नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या युवक महोत्सवात यावेळी विविध प्राधिकरणाचे सदस्य, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भुकन, अधिसभा सदस्य स्वप्नाली महाजन, अमोल सोनवणे, नितीन ठाकूर, दीपक पाटील, भानुदास येवलेकर, केदारनाथ कवडीवाले,दिनेश खरात, अमोल मराठे, सुनील निकम, ॲङ केतन ढाके, जयंत उत्तरवार, नेहा जोशी, मिनाक्षी निकम, प्रा.विशाल पराते, प्रा.किर्ती कमळजा, प्रा. संदीप नेरकर, डॉ. धिरज वैष्णव, प्रा. मंदा गावीत, प्रा. सखाराम पाटील, प्रा. गजानन पाटील, प्राचार्य आय.डी. पाटील, डॉ.ऋषीकेश चित्तमवार, वैशाली वराडे, नवसंशोधन, नवोपक्रम व सहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, डॉ. आशुतोष पाटील, संचालक क्रीडा विभाग डॉ.दिनेश पाटील, विद्यापीठ प्रशाळेचे संचालक, शिक्षक, अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, विविध समितीचे सदस्य, सहभागी विद्यापीठांचे विद्यार्थी व संघ व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरूवारदि. ६ नोव्हेंबर रोजी होणारे कार्यक्रम : रंगमंच क्र. १ – राष्ट्रकवी बंकीमचंद्र चटोपाध्याय रंगमंच (दीक्षांत सभागृह) मध्ये भारतीय समुहगान -सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत रंगमंच क्रमांक २ – स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह (सिनेट सभागृह) मध्ये पाश्चिमात्य गायन स. ९ ते दु.२ वाजेपर्यंत व पाश्चिमात्य वाद्यसंगीत दु. ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत, रंगमंच क्रमांक ३ – भगवान बिरसा मुंडा सभागृह (डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी भवन सभागृह) मध्ये एकांकिका स. ९ ते रात्री १० वाजेपर्यंत, रंगमंच क्रमांक ४ – क्रांतिवीर खाज्या नाईक सभागृह (पर्यावरणशास्त्र प्रशाळा सभागृह) मध्ये वक्तृत्व स्पर्धा स. ९ ते दु.२ वाजेपर्यंत, प्रश्नमंजुषा सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत रंगमंच क्रमांक ५ – बाल हुतात्मा शिरीष कुमार सभागृह (जैवशास्त्र प्रशाळा सभागृह) मध्ये मातीकला स. ९.३० ते दु.१२ वाजेपर्यंत, चिकटकला दु. २ ते सायं. ४.३० वाजेपर्यंत, रांगोळी सायं. ५ ते सायं. ७.३० वाजेपर्यंत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम