
महावातिका व्यापारी संकुलातील भाडेवाढीविरोधात गाळेधारकांचा बंद, आंदोलन स्थगित
महावातिका व्यापारी संकुलातील भाडेवाढीविरोधात गाळेधारकांचा बंद, आंदोलन स्थगित
जळगाव | प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील रेडीरेकनरच्या ५ टक्के दराने भाडे आकारण्याच्या निर्णयाविरोधात गाळेधारक संघटनेने सोमवारी (२६ मे) दुपारी २ वाजेपर्यंत मार्केट बंद आंदोलन पुकारले होते. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत महानगर गाळेधारक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
महापालिकेच्या १८ व्यापारी संकुलांतील सुमारे २,३६८ गाळ्यांची मुदत २०१२ पासून संपलेली असून, तरीही भाडे नूतनीकरणाचा निर्णय घेतला गेलेला नव्हता. नुकताच महापालिकेने रेडीरेकनर दराच्या ५ टक्के भाडे आकारण्याचा निर्णय घेतला. हा दर गाळेधारकांना परवडणारा नसल्याने त्यांनी याला तीव्र विरोध केला. गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेतली.
या चर्चेमध्ये गाळेधारकांच्या मागण्या ऐकून घेण्यात आल्या. तसेच, माळे हस्तांतरण व नूतनीकरण समितीत गाळेधारक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष डॉ. सोनवणे यांना तज्ज्ञ सदस्य म्हणून समाविष्ट करावे, अशी मागणीही करण्यात आली.
गाळेधारकांचा आरोप आहे की, अविकसित संकुलांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना रेडीरेकनरच्या ५ टक्के दराने भाडे भरता येणार नाही. त्याऐवजी २०१७-१९ दरम्यानच्या २ टक्के दराने भाडे आकारावे, अशी मागणी आहे. यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांनीही मध्यस्थी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दुपारपर्यंत बंद होते मार्केट
छत्रपती शाहू मार्केट, बाबासाहेब आंबेडकर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, रामलाल चौधरी मार्केट, धर्मशाळा मार्केट, गंगालाल मिल मार्केट, वलेचा मार्केट, जुने शाहू मार्केट, भास्कर मार्केट, नानीबाई असवा मार्केट, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळील दुकाने, रेल्वेस्टेशन परिसर, लाठी शाळा परिसर, भोईटे हायस्कूलसमोरील मार्केट आदी ठिकाणांवरील दुकाने सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
यांची होती उपस्थिती
आयुक्तांसोबतच्या चर्चेला डॉ. शांताराम सोनवणे, राजम कोतवाल, युवराज चाप, अशिष सपकाळे, प्रदीप मंडोरा, सुरेश पाटील आदी गाळेधारक उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम