
महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक
महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक
जळगाव : महावितरणच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विद्युत सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना पत्र पाठवून ‘शून्य विद्युत अपघात उद्दिष्टाच्या जनजागृतीसाठी हे अभियान देशासाठी एक आदर्श आहे’, असे त्यांनी गौरवोद्गार काढले.
विद्युत सुरक्षेबाबत राज्यभरात जनजागृती करण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘प्रकाशमान महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र’ या विद्युत सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली. मानव संसाधन विभागाचे संचालक श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत यांच्या नियोजनातून दि. १ ते ६ जून दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत तब्बल २ लाख ११ हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यासह महावितरणकडून मोबाईल ‘एसएमएस’द्वारे १ कोटी ९३ लाख आणि ‘ई-मेल’द्वारे ३५ लाख ७३ हजार वीजग्राहकांना विद्युत सुरक्षेबाबत संदेश पाठविण्यात आले.
आजवरच्या सर्वाधिक लोकसहभागाच्या विद्युत सुरक्षा अभियानाची खास दखल घेत केंद्रीय नवीन व नवकरणीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांनी पत्राद्वारे कौतुक केले आहे. ‘महावितरणने शून्य विद्युत अपघाताच्या उद्दिष्टासाठी सुरू केलेल्या जनजागृती अभियानाचे केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाच्या वतीने कौतुक करतो. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने हे अभियान राबवविले आहे. त्यातून प्रत्यक्ष लोकसहभाग व डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विद्युत सुरक्षेबाबत प्रभावी प्रबोधन व जनजागरण करण्यात आले. महावितरणचे सर्व संचालक, क्षेत्रीय अभियंते, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी दिलेले योगदान शून्य विद्युत अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांची या अभियानामुळे विद्युत सुरक्षेसाठी असलेली बांधिलकी दिसून येते. विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होत आहे. महावितरणचे हे विद्युत सुरक्षा अभियान देशातील इतर राज्यांसाठी आदर्श आहे’, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम