महावितरणच्या झटपट योजनेचा उद्योजकांना लाभ

बातमी शेअर करा...

महावितरणच्या झटपट योजनेचा उद्योजकांना लाभ

जळगाव घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व वीज ग्राहकांना गरजेनुसार वीजवापर वाढविण्यासाठी महावितरणने झटपट स्वयंचलित परवानगी योजना राबविल्यामुळे राज्यातील ४,१६४ वीज ग्राहकांनी सुमारे एक महिन्यात २२ मेगावॅट क्षमता वाढवून घेतली. यामध्ये २४६० औद्योगिक वीज ग्राहकांचा समावेश असून दिवाळीपूर्वी मागणीनुसार उत्पादन वाढविण्यास त्यांना मदत झाली.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, वीज ग्राहकांना अधिकाधिक सहजपणे सेवा मिळण्यासाठी प्रक्रियेत बदल करण्याची सूचना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार ‘इज ऑफ लिव्हिंग’च्या सूत्रानुसार महावितरणने वीज ग्राहकांसाठी मंजूर भार वाढविण्यासाठी (लोड एनहान्समेंट) एक स्वयंचलित व्यवस्था सुरू केली आहे.

या योजनेमध्ये ग्राहक घरबसल्या महावितरणच्या मोबाईल अॅप्लिकेशन किंवा वेबसाईटवर अर्ज सादर करून आणि योग्य शुल्क भरून आपला मंजूर भार वाढवून घेऊ शकतात. ग्राहकाने शुल्क भरल्यानंतर ४८ तासात त्याला परवानगी असलेला मंजूर भार वाढवून दिला जातो.

महावितरणने ही सुविधा २६ सप्टेंबर रोजी सुरू केली. महिनाभरात राज्यातील ४,१६४ ग्राहकांनी नव्या सुविधेचा लाभ घेतला. त्यामध्ये सर्वाधिक २,४६० औद्योगिक वीज ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांची संख्या ९४२ असून ५०९ व्यावसायिक ग्राहकांनी सुविधेचा लाभ घेतला. याखेरीज २५३ अन्य ग्राहकांनाही लाभ झाला.

वीज ग्राहकांना महावितरणकडून कनेक्शन देताना त्यांच्या मागणीनुसार वीज वापराबाबतची क्षमता निश्चित केली जाते, त्याला मंजूर भार म्हणतात. औद्योगिक ग्राहकांना उत्पादनात वाढ होत असेल किंवा अधिक क्षमतेची यंत्र सामुग्री वापरायची असेल तर अधिक भार मंजूर करून घ्यावा लागतो. सामान्यतः घरगुती वीज ग्राहकांचा मंजूर भार दोन ते पाच किलोवॅट इतका असतो. ग्राहकांना एअर कंडिशनिंगसारख्या सुविधा बसविण्यासाठी भार वाढवून घ्यावा लागतो. महावितरणने सुरू केलेल्या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन सेवा उपलब्ध झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या साडेतीन वर्षात वीज वितरण जाळे अधिक मजबूत केले आहे. तसेच ग्राहकांच्या वाढत्या गरजेनुसार वीज उपलब्ध होण्यासाठी वीज खरेदी करार केले आहेत. त्यामुळे महावितरण ग्राहकांच्या मागणीनुसार तातडीने अधिक भार मंजूर करू शकत आहे.

महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी १ जुलैपासून नवीन वीजदर रचना लागू झाली आहे. प्रथमच सर्व प्रवर्गातील वीज ग्राहकांच्या वीज दरात कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज वापरासाठी दरामध्ये अतिरिक्त सवलतही देण्यात येत आहे. त्याचा लाभ घेऊन अनेक वीज ग्राहकांचा वीज वापर वाढला आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या कनेक्शनसाठीचा भार वाढवून घेणे उपयुक्त ठरत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम