
महिलांना कायद्याची माहिती असणे आवश्यक; ॲड. महेश भोकरीकर यांचे प्रतिपादन
महिलांना कायद्याची माहिती असणे आवश्यक; ॲड. महेश भोकरीकर यांचे प्रतिपादन
महिला सुरक्षा कायद्यांवर सविस्तर मार्गदर्शन
जळगाव: महिलांचे हक्क, अधिकार आणि सुरक्षा अबाधित राहावी यासाठी बनवलेल्या कायद्यांची माहिती प्रत्येक महिलेला असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वकील ॲड. महेश भोकरीकर यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिलांचे हक्क व सुरक्षा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या अधिसभागृहात २० ऑगस्ट रोजी पार पडला.
आपल्या व्याख्यानात ॲड. भोकरीकर यांनी महिलांशी संबंधित विविध कायद्यांमधील तरतुदी सविस्तरपणे समजावून सांगितल्या. त्यांनी पॉक्सो (POCSO) कायदा, इन कॅमेरा चौकशी, महिलांसाठी भरपाईची तरतूद आणि अत्याचाराचे खटले जलद न्यायालयात चालविण्याची आवश्यकता यावर विशेष भर दिला.
विनामूल्य विधी सेवा उपलब्ध
कार्यक्रमात सहाय्यक लोक अभिरक्षक ॲड. शिल्पा रावेरकर यांनी विनामूल्य विधी सेवा, कायदेविषयक सल्ला आणि वकील मिळण्याबाबतच्या तरतुदींची माहिती दिली. ‘१५१००’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून कायदेविषयक मोफत सल्ला मिळवता येतो, असे त्यांनी सांगितले.
न्यायाची वेळ येऊ नये
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला महिलांचा आदर करण्याचे आवाहन केले. ‘असा समाज निर्माण व्हावा जिथे महिलांवर अत्याचार होऊ नये आणि त्यांना न्यायालयात जाण्याची वेळ येऊ नये,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, आज मिळालेल्या कायद्याच्या माहितीचा अभ्यास करून गरजू महिलांना मदत करण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. कीर्ती कमळजा यांनी केले. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम