महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र लांबविले

बातमी शेअर करा...

महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र लांबविले

जळगाव : शहरातील शिवशक्तीनगर रोड परिसरात सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी पायी फिरणाऱ्या प्रौढ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवशक्तीनगर परिसरात राहणाऱ्या उषाबाई देविदास बोरसे या महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्या नेहमीप्रमाणे दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास आपल्या नात कनिष्कासह फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. रात्री सव्वानऊच्या सुमारास त्या सुनील रत्नपारखे यांच्या घरासमोरून परतत असताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्याजवळ येताच मागील सीटवर बसलेल्या २५ ते ३० वयोगटातील काळी टोपी घातलेल्या इसमाने झडप घालून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र व त्यातील पदक हिसकावले आणि दुचाकीवरून वेगाने पळ काढला.

अचानक झालेल्या या घटनेने घाबरलेल्या उषाबाईंनी आरडाओरड केली, मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. उषाबाई बोरसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार धनराज पाटील पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम