मांडळ येथे वाळू माफीयांचा तलाठ्यावर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा...

मांडळ येथे वाळू माफीयांचा तलाठ्यावर जीवघेणा हल्ला

अमळनेर (प्रतिनिधी) : मांडळ (ता. अमळनेर) येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

मा. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशानुसार अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी ब्राम्हणे तलाठी विकेश भोई, शाहपुर तलाठी विक्रम कदम यांच्यासह संबंधित अधिकारी मांडळ गावाकडे जात होते. सायंकाळी पाच वाजता जवखेडा रोडवर निळ्या रंगाचा विनानंबर ट्रॅक्टर वाळूसह दिसला. पथकाने वाहन अडवून चालकाला परवाना व तपशील विचारला असता त्याने नकार दिला. त्यानंतर तलाठी विक्रम कदम यांनी ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गोपाल बाळु पाटील (रा. सातरणे, जि. धुळे) व अजय ईश्वर कोळी (रा. मांडळ) हे दोघे घटनास्थळी आले. त्यांनी तलाठी विक्रम कदम यांना मारहाण करून ट्रॅक्टरवरून खाली ओढले तसेच विकेश भोई यांना देखील शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी गोपाल पाटील ट्रॅक्टरवर बसला व हायड्रोलिक करून ट्रॉलीतील वाळू रस्त्यावर टाकत ट्रॅक्टर घेऊन अमळनेरच्या दिशेने पसार झाला.

या प्रकारामुळे महसूल अधिकाऱ्यांचे शासकीय कामकाज अडथळ्यात आले. घटनेची माहिती तहसीलदारांना दिल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गोपाल बाळु पाटील व अजय ईश्वर कोळी यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशान्वये पोउपनि युवराज बागुल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम