माजी आमदार साहेबराव पाटलांच्या बंगल्यात चोरी; ३४ लाखांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा...

माजी आमदार साहेबराव पाटलांच्या बंगल्यात चोरी; ३४ लाखांचा ऐवज लंपास

पारोळा (प्रतिनिधी): पारोळा तालुक्यातील राजवड येथे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३४ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात २४ लाख रुपयांचे ७०० ग्रॅम सोने आणि १० लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. २ ऑगस्ट रोजी पहाटे २ ते ४ च्या सुमारास ही चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळी घरामागील अरुण पाटील यांनी घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पाहणी केली असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तातडीने साहेबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.

चोरट्यांनी घरातील कपाटातून ९ लाख रुपयांची ३०० ग्रॅमची मंगल पोत, ७ लाखांच्या २०० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, ८ लाखांचे २०० ग्रॅमचे नेकलेस आणि १० लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. याशिवाय, ८ हजार रुपयांचा डीव्हीआर (DVR) सुद्धा चोरट्यांनी पळवला.

एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये चार चोरटे कंपाउंडची भिंत ओलांडून घरात प्रवेश करताना दिसत आहेत. पहाटे २ वाजून ३९ मिनिटांनी घरात शिरलेले चोरटे ३ वाजून १४ मिनिटांनी म्हणजेच अवघ्या ३५ मिनिटांत चोरी करून बाहेर पडले.

याप्रकरणी निलेश उर्फ बाळा अशोक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी, एलसीबी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथक, फॉरेन्सिक पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते, मात्र चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम