
माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
लातूर प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. लातूरमधील त्यांच्या ‘देवघर’ या निवासस्थानी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. वाढत्या वयानुसार असलेल्या दीर्घ आजारपणामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
शिवराज पाटील चाकूरकर हे चाकूर गावातला साधा मुलगा ते अभ्यासू राजकारणी असा प्रवास त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञानाची पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी 1967 मध्ये लातूर नगरपालिकेतून राजकारणात पाऊल ठेवले. पुढे 1980 ते 1999 पर्यंत सलग सात वेळा लातूर लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, अवकाश अशा संवेदनशील खात्यांची धुरा सांभाळली. नंतर 1991 ते 1996 लोकसभेचे सभापती म्हणून त्यांनी संसदेला आधुनिक रूप दिले. संगणकीकरण, थेट प्रक्षेपण, नव्या ग्रंथालय इमारतीचे बांधकाम, संसदीय कामकाजात पारदर्शकता हे सर्व त्यांचे योगदान आहे. इतकेच नव्हे तर देश-विदेशातील संसदीय परिषदांमध्ये भारताचे प्रभावी नेतृत्व केले. उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची कल्पनाही त्यांचीच होती.
यानंतर 2004 मधील निवडणुकीत पराभव झाला. तरीही सोनिया गांधींनी त्यांच्यावर विश्वास टाकत गृहमंत्रिपद दिले. पण 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला. नंतर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी अतिशय संयमाने काम केले. आजच्या राजकारणात जिथे स्वच्छ प्रतिमा दुर्मीळ झाली, तिथे शिवराज पाटील चाकूरकर अपवाद होते. सत्य साईबाबांचे निष्ठावंत भक्त, लिंगायत समाजाचा अभिमान, कुटुंबवत्सल पिता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक. लातूरच्या ‘देवघर’ निवासस्थानी आज सकाळी साडे सहा वाजता त्यांनी शांततेत देह ठेवला. पण त्यांचा वारसा, त्यांची शिकवण आणि त्यांचं स्वच्छ राजकारण मात्र कायम अमर राहील.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम