
मातामृत्यूदर शून्यपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार
मातामृत्यूदर शून्यपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञांचा संकल्प
जळगाव प्रतिनिधी सुरक्षित मातृत्वा हा प्रत्येक मातेचा अधिकार आहे. मात्र सध्याच्या काळात माता मृत्यू दराचे वाढते प्रमाण लक्षात घेता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाने मातामृत्यू दर शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर यांनी दिली.
मातामृत्यूदर कमी करणे हे देशासमोरील एक मोठे आव्हान मानले जाते. गर्भधारणा आणि प्रसुतीदरम्यान होणार्या गुंतागुंतीमुळे अनेक महिलांचे जीवन धोक्यात येते. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आशादायी अशी घोषणा करण्यात आली आहे. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर यांनी मातामृत्यूदर शून्यापर्यंत आणण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला आहे. अत्याधुनिक वैद्यकीय साधने, अनुभवी डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि २४ तास ७ आपत्कालीन सुविधा यांच्या मदतीने हा उद्देश साध्य करण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे.
दोन रूग्णालयात सुविधा
जळगाव विभागासाठी महादेव रूग्णालयात आणि भुसावळ विभागासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मातांसाठी सर्वसमावेशक, सुरक्षित व दर्जेदार उपचाराची मजबूत यंत्रणा उभारण्यात आली आहे. दोन्ही रुग्णालयांमध्ये गुंतागुंतीच्या गर्भधारणेवर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक असलेली एनआयसीयू, पीआयसीयू, ब्लड बँक, ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी यंत्रणा, २४ तास अॅम्ब्युलन्स सेवा या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.मातामृत्यूदर वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे प्रसूतीदरम्यान होणारे अतिरक्तस्राव, उच्च रक्तदाब, संसर्ग, वेळेवर उपचार न मिळणे, अल्पवयीन गर्भधारणा आणि पोषणाची कमतरता. या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून रुग्णालयात समग्र गर्भपूर्व तपासणी, नियमित हेल्थ चेकअप कॅम्प, जोखमीच्या गर्भधारणेची स्वतंत्र तपासणी, तसेच गरजू महिलांसाठी पोषण सल्ला यांसारख्या महत्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे.
दोन्ही रुग्णालयांत ‘हाय-रिस्क प्रेग्नन्सी’ साठी विशेष वॉर्ड, अनुभवी डॉक्टरांची टीम, तज्ञ नर्स आणि आवश्यक औषधांचा सदैव उपलब्ध साठा याची व्यवस्था केली आहे. डॉ. माया आर्विकर यांनी सांगितले की, आमचे ध्येय केवळ उपचार देणे नव्हे, तर प्रत्येक आई सुरक्षित राहणे आणि प्रत्येक बाळ निरोगी जन्माला येणे हे आहे. जळगाव आणि भुसावळ विभागातील मातांसाठी उत्तम सुविधा देत आम्ही जिल्ह्याचा मातामृत्यूदर शून्याकडे नेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या त्या म्हणाल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम