
मातोश्री आनंदाश्रम येथे पाणलोट विकासावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू
मातोश्री आनंदाश्रम येथे पाणलोट विकासावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू
जळगाव | केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्पाच्या वतीने मातोश्री आनंदाश्रम येथे दोन दिवसीय जलसंधारण प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. या उपक्रमाचा उद्देश गावकऱ्यांना पाणलोट कामात तांत्रिक मार्गदर्शनासह सक्रिय सहभागासाठी प्रेरित करणे हा आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी Burns & McDonnell Engineering India Pvt. Ltd., मुंबई येथील श्री. मनोज मराठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मिलिंद पंडित आणि डॉ. स्वाती संवत्सर (रेवाखंड फाउंडेशन, इंदोर) यांनी प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रकल्प प्रमुख अनिल भोकरे यांनी प्रशिक्षणाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना, पाणलोट क्षेत्रातील कामाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. नीलकंठ गायकवाड होते. त्यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देत पाणलोट कामातील सहभागाचे मोल विषद केले.
या प्रशिक्षणात जामनेर तालुक्यातील नागणचौकी परिसरातील पाच गावांतील ५० शेतकरी सहभागी झाले आहेत. या गावांमध्ये लवकरच पाणलोट प्रकल्पांचे सर्वेक्षण सुरू होणार असून, विजय कोळी यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पथक यासाठी कार्यरत राहणार आहे.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी पाणी फाउंडेशनचे ‘गटशेती’ पुरस्कार विजेते सदस्य सहभाग घेऊन गटशेती मॉडेलविषयी मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे सहभागी शेतकऱ्यांना व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून अधिक प्रभावी माहिती मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य सावळे (प्रकल्प व्यवस्थापक) यांनी केले, तर आभारप्रदर्शन राजन इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवीण देशमुख (प्रकल्प प्रमुख, मातोश्री आनंदाश्रम) आणि दिलीप चोपडा (कोषाध्यक्ष, केशवस्मृती प्रतिष्ठान) यांचे विशेष योगदान लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम