
मादणी शिवारात लाखो रुपयांच्या वीजतारांची धाडसी चोरी
मादणी शिवारात लाखो रुपयांच्या वीजतारांची धाडसी चोरी
चोरीसाठी वापरलेली कार पोलिसांच्या ताब्यात; चोरटे पसार, फत्तेपूर पोलिसात गुन्हा
फत्तेपूर, ता. जामनेर :
मादणी शिवारात उभ्या करण्यात आलेल्या तब्बल १२ विद्युत खांबांवरील उच्चदाब वीजतारा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पोलिसांनी चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे. मात्र, चोरी करणारे चोरटे फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फत्तेपूर ते जामनेर राज्य महामार्ग क्रमांक ४४ लगत लोणी गावाच्या गावठाण विस्तारात मेघा इलेक्ट्रिक कंपनीकडून सौर विद्युत उर्जिकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत फत्तेपूर येथील विद्युत केंद्रापर्यंत नवीन विद्युत खांब उभारून वीजतारा ओढण्याचे काम पारोळा येथील किरणदीप या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. याच कामांतर्गत मादणी गावाजवळ उभारण्यात आलेल्या १२ विद्युत खांबांवरील वीजतारा चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
दि. १८ डिसेंबर रोजी कंपनीचे सहकारी अजय पाटील, पुलकेश पाटील व सागर पाटील हे कामाची पाहणी करीत असताना मादणी गावाजवळील १२ खांबांवरील वीजतारा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांकडे चौकशी केली; मात्र कुठलीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर ठेकेदार विकास पाटील यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची तक्रार दाखल केली.
या चोरीप्रकरणात अज्ञात चोरट्यांनी १२ विद्युत खांबांवरील तब्बल २ हजार ९७० मीटर लांबीची उच्चदाबाची अॅल्युमिनियम वीजतार चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची अर्टीगा कार (क्रमांक एमएच-१४ एमटी-२३६५) तसेच वीजतारा कापण्यासाठी वापरलेले दोन कटर जप्त केले आहेत. मात्र, चोरी करणारे संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तुषार इंगळे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम