
‘मारक्या’ बैलाचा अनोळखी फटका; कासरा गळ्यात अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
‘मारक्या’ बैलाचा अनोळखी फटका; कासरा गळ्यात अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
सोयगाव, (प्रतिनिधी) – पळाशी शिवारात आपल्या बैलांना चारत असताना एका बैलाच्या अनपेक्षित उधळ्यामुळे हातातील कासरा गळ्यात अडकून एका २४ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचा पंचनामा बुधवारी (दि. ३०) महसूल विभागाने केला.
मृत शेतकऱ्याचे नाव लखन नामदेव शिंदे (वय २४, रा. पळाशी, ता. सोयगाव) असे असून, तो आपल्या शेतातील गट क्र. ३०५ मध्ये दोन्ही बैलांना शेताच्या बांधावर चारत होता. या वेळी त्याच्या हातात दोघांचे कासरे होते. अचानक त्यातील एक बैल भडकला आणि उधळताच हातातील कासरा थेट लखनच्या गळ्यात अडकला. गळ्याभोवती आवळपट्टी बसल्यामुळे त्याचा गळा दाटून दम गुदमरल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला.
रात्री उशिरापर्यंत लखन घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. रात्री आठच्या सुमारास त्याचा मृतदेह शेतात आढळून आला. तातडीने बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
लखन शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
‘मारका’ बैलही शांत होता… पण क्षणात घडले अनर्थ
सदर बैल मारक्या स्वभावाचा असल्याची ग्रामस्थांची माहिती असूनही, लखनच्या सान्निध्यात तो अत्यंत शांत राहत असे. इतर कोणी जवळ जाईल, तर बैल आक्रमक होत असे. लखन व त्याच्यात सुरुवातीपासूनच स्नेहाचे नाते होते. मात्र, चरत असताना गवतात काहीतरी दिसल्याने बैल अचानक भडकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम