
मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या पथकाला महिलेची आत्महत्येची धमकी
जळगाव: कर्जाचे हप्ते थकल्याने मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय पथकाला मेहरुण शिवारातील एका महिलेने आत्महत्येची धमकी दिल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी मीना जितेंद्र गायकवाड (रा. अशोकनगर) या महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
ठाणे येथील एका खासगी वित्त कंपनीकडून मीना गायकवाड यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे त्यांच्याकडे सुमारे २२ लाख रुपयांची थकबाकी होती. यामुळे, कंपनीने थकबाकी वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी कंपनीचे प्राधिकृत अधिकारी दिनेश कल्याणजी परमार, त्यांचे कायदेशीर सल्लागार आणि नायब तहसीलदार दिगंबर जाधव यांचे पथक अशोक नगरात पोहोचले.
आत्महत्येची धमकी
पथक मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी आले असता, मीना गायकवाड यांनी त्यांना विरोध केला. त्यांनी आदेशाचे उल्लंघन करत ‘आमच्या जिवाचे बरे-वाईट करून घेऊ,’ अशी धमकी दिली. यामुळे पथकाला माघार घ्यावी लागली.
या घटनेनंतर कंपनीचे प्राधिकृत अधिकारी दिनेश परमार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मीना गायकवाड या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम