मित्र गण – जनता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला माजी विद्यार्थ्यांचा चोपड्यात स्नेह मेळावा उत्साहात

बातमी शेअर करा...

मित्र गण – जनता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला माजी विद्यार्थ्यांचा चोपड्यात स्नेह मेळावा उत्साहात

चोपडा : जनता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अकोला येथील माजी विद्यार्थ्यांचा “ जुनी मैत्री – नवा उत्साह ” स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. हा संस्मरणीय सोहळा पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या विशेष प्रयत्नातून पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे दि. 27 व 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार आणि स्नेहमेळाव्याचे मुख्य प्रेरणास्थान डॉ. सुरेश (‘बाबा’) पाटील (खानापूर, ता. रावेर) हे होते. उद्घाटनावेळी डॉ. पाटील यांनी सर्व मान्यवर व माजी विद्यार्थ्यांचा परिचय करून देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमात पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान संचालक डॉ. सुरेश बोरोले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा प्रभावी आढावा योगेश चौधरी यांनी आपल्या वाणीतून आणि ध्वनिफितीद्वारे सादर केला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉ. सुरेश ‘बाबा’ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, तर पंकज संस्थेतर्फे पाहुण्यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.

या दोन दिवसीय मेळाव्यात जुन्या मित्रांच्या गप्पा, आठवणींचा उजाळा, सांस्कृतिक संध्या, तसेच दुसऱ्या दिवशी मनुदेवी दर्शन , मालापुर धरण भेट यासह पंकज शैक्षणिक संकुल ,पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तसेच पंकज समूहाच्या विविध संस्थांना भेटी देणे असे आकर्षक कार्यक्रम झाले. वातावरणात जुन्या दिवसांची आठवण, आनंद आणि स्नेह यांची प्रचिती आली.

स्नेहमेळाव्यासाठी वाशिम, सेवाग्राम, जळगाव, धुळे, अकोला, कल्याण, येवला, इंदोर, संभाजीनगर, पुणे, शेगाव, मालेगाव, सातारा, नाशिक, परभणी, जालना, संगमनेर, सटाणा, चंदिगड, सिंदखेडराजा, कन्नड आदी ठिकाणांहून ७७ युगल व ५० स्वतंत्र असे एकूण २०४ मित्र गण उपस्थित होते. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी डॉ. सुरेश ( बाबा ) पाटील आणि डॉ. सुरेश बोरोले यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले.

सन २०१७ पासून सुरू झालेल्या या स्नेहमेळाव्याच्या मालिकेची सुरुवात शेगाव पासून झाली.प्रथम मेळाव्यास फक्त २७ मित्र गण उपस्थित होते.२०१८ चा मेळावा फर्धापूर तर २०१९ ते २०२३ चा मेळावे शेगाव येथे घेण्यात आले.२०२४ चा मेळावा शिर्डी येथे घेण्यात आला त्यावेळी ६५ युगल व ५० स्वतंत्र व्यक्ती उपस्थित होते.तर २०२५ चा मेळावा अभूतपूर्व यशस्वी झाला. सदर मेळाव्यास ७७ युगल व ५० स्वतंत्र व्यक्ती उपस्थित होते. वयाच्या सत्तरीपार गेलेल्या या माजी विद्यार्थ्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल, असे दृश्य या सोहळ्यात पाहायला मिळाले.

आमच्या वर्गमित्राचा अभिमान
जनता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अकोला येथील आमचा वर्गमित्र डॉ. सुरेश बोरोले यांचे शैक्षणिक, सामाजिक तसेच बांधकाम क्षेत्रातील कार्य अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे.
आम्ही त्यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण घेतले, उपचारसेवेतील वाटचाल एकत्र अनुभवली. परंतु आज त्यांनी शिक्षण, समाज आणि बांधकाम क्षेत्रातील भव्य कामगिरी पाहून आम्हाला आश्चर्य आणि अभिमान दोन्ही वाटते.
एकेकाळी वैद्यकीय शास्त्रातील आमचा मित्र आज पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून शैक्षणिक विकासासाठी कार्य करतो आहे. समाजहितासाठी केलेल्या प्रयत्नांनी आणि दूरदृष्टीने त्यांनी अनेक शाळा, सामाजिक प्रकल्प आणि बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय निर्मिती उभी केली आहे.

आजही आम्हाला विश्वास बसत नाही की, आमच्या वर्गातील एक साधा, मनमिळाऊ विद्यार्थी इतक्या मोठ्या स्तरावर समाजहिताचे कार्य करेल आणि हजारो लोकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल.आम्हा सर्व वर्गमित्रांना डॉ. सुरेश बोरोले यांचा अभिमान असून त्यांच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या. त्यांचा हा यशस्वी प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ. किशोर मालोकार (प्राचार्य व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ) , राम पागरूत , रवींद्र जैन शरद मकमले ,रावसाहेब पवार, प्रदीप शहा, डागलीया ,राजाभाऊ देशमुख, अरुण देपुरा ,अशोक नेतकर, वसंत डोईफोडे ,पंडित सुर्वे, रमेश पाटील ,प्रकाश नवाल ,अनिल आगीवाल, नलिनी तरणावर, उषा जैन आदींनी परिश्रम घेतले. हा स्नेहमेळावा जुनी मैत्री दृढ करीत पुढील वाटचालीस नवी ऊर्जा देणारा ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम