
मुक्ताईनगरच्या तरुण आयआयटी इंजिनिअरची कानपूर येथे आत्महत्या
मुक्ताईनगर: मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी असलेल्या दीपक शिरीष चौधरी (वय २५) या तरुण आयआयटी इंजिनिअरने कानपूर येथे आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कोथळी गावावर आणि त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दीपक चौधरी हा मूळचा कोथळी गावातील रहिवासी असून, सध्या तो दीपनगर येथे राहत होता. नुकताच तो आयआयटी इंजिनिअरची परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि त्याला कानपूर येथील एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच तो नोकरीवर रुजू झाला होता.
मात्र, कानपूर येथील त्याच्या निवासस्थानी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी कळताच त्याच्या कुटुंबाला आणि कोथळी गावातील लोकांना मोठा धक्का बसला. दीपकच्या आत्महत्येचे वृत्त कळताच त्याचे पार्थिव कानपूरहून रुग्णवाहिकेतून कोथळी येथे आणण्यात आले.
गावावर शोककळा
बुधवारी (२७ ऑगस्ट) सकाळी त्याचे पार्थिव गावात पोहोचले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात आणि परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. दीपकचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत दु:खद आणि शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एक यशस्वी आणि हुशार तरुण अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले, हे कोणालाही कळत नाहीये. नोकरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेने शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या अपेक्षा असलेल्या तरुणांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम