
मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात ; पती, पत्नी व मुलगा ठार; डंपर पेटवला
मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात ; पती, पत्नी व मुलगा ठार; डंपर पेटवला
मुक्ताईनगर I तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने अपघाताला कारणीभूत ठरलेला डंपर पेटवून दिला.
इंदोर–हैदराबाद महामार्गाचे काम करणाऱ्या बी.एन. अग्रवाल कंपनीचा मुरूम भरलेला डंपर (क्र. एमएच-१९ सीएक्स-२०३८) हा वेगाने जात असताना त्याने दुचाकीला धडक दिली. यात पती नितेश जगतसिंग चव्हाण (३२), पत्नी सुनिता नितेश चव्हाण (२५) आणि मुलगा शिव नितेश चव्हाण (७, रा. मातापूर, ता. डोईफोडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा नेहालसिंग नितेशसिंग चव्हाण (११) गंभीर जखमी असून त्याला तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
हे कुटुंबीय देवीचे दर्शन घेण्यासाठी इच्छापूरकडे जात होते. परंतु महामार्गावरील या अपघातात त्यांचे संसारच उद्ध्वस्त झाले. दरम्यान, घटनास्थळी संतप्त नागरिकांनी डंपरची तोडफोड करून आग लावली. चालक नेहमी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवतो, असा आरोप जमावाने केला.
या वेळी पोलिसांनी तत्परता दाखवत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. अपघातातील मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले असून रात्रीपर्यंत पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम