
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार
शेगाव /प्रतीनीधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी कुणबी समाज मंगल कार्यालय, शेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री. भास्करराव पेरे पाटील यांची विशेष उपस्थिती होती. तसेच माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री. सतीश देशमुख, गटविकास अधिकारी श्री. चंदनसिंह राजपूत, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सुरसे, गट शिक्षणाधिकारी श्री. संजय सुडकर, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी कृषी, आरोग्य अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे मा. सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, अंगणवाडी सेविका व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व मार्गदर्शन गटविकास अधिकारी श्री. चंदनसिंह राजपूत यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश देशमुख यांनी सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. विस्तार अधिकारी पंचायत श्री. पी. एस. राजपूत यांनी अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रमुख पाहुणे श्री. भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामपंचायतच्या विकासकामांबाबत मार्गदर्शन करून, अडचणींवर मात करून अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायत प्रतिनिधींना प्रेरित केले. या वेळी शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी उपस्थितांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच पहुरपूर्णा सरपंच मुकुंद सुलताने व परसुल सरपंच योगेश पाटील यांनी सुद्धा आपले विचार मांडत ग्रामविकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी सरपंच संघटनेतर्फे सरपंच सदाभाऊ पुंडकर (येउलखेड) यांनी सर्व सरपंचांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेत वृक्षलागवड उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ग्रामपंचायत कठोरा येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री. पंकज खंडारे व सरपंच सौ. खवले यांचा, तसेच प्रगतीशील महिला शेतकरी म्हणून ग्रामपंचायत बेलोरा येथील सौ. रुख्मिणी उमाळे यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय उत्कृष्ठ शाळा उपक्रमांतर्गत क्रमांक पटकावलेल्या शाळा व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री. सुलताने यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी कृषी श्री. एस. एस. इंगोले यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम