
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना निधी पत्राचे वाटप
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना निधी पत्राचे वाटप
जळगाव l प्रतिनिधी– जिल्ह्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी दिलासा देणाऱ्या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कार्य जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक १ मे २०२५ रोजी सुरू करण्यात आले. हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच सुरू झाला असून, रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळवण्याची प्रक्रिया आता जिल्हास्तरावरच पार पडू लागली आहे.
या कक्षामार्फत आतापर्यंत एकूण २१ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली असून त्यातील पहिल्या दोन रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र प्रदान करण्यात आले. याअंतर्गत दिनांक १६ मे २०२५ रोजी ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव येथे उपचार घेत असलेले दौलत बंडू सोनवणे व न्युक्लियस हॉस्पिटल येथील रुग्ण जिजाबाई अशोक पाटील यांना उपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये मदतीचे पत्र रुग्णांच्या नातेवाईकांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया मुंबई येथे पार पडत होती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना वेळ, पैसा व गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व रामेश्वर नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून ही प्रक्रिया जिल्हास्तरावर आणण्यात आली असून यामुळे गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळवणे शक्य झाले आहे. रुग्ण व नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव
संपर्क क्रमांक: 9309844510
ई-मेल: jalgaoncmrf@gmail.com

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम