
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आता ५ महिन्याची मुदतवाढ
गरजु युवकांना रोजगाराची संधी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आता ५ महिन्याची मुदतवाढ
गरजु युवकांना रोजगाराची संधी
जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्रातील युवक युवतींना शासकीय व खाजगी आस्थापना /उद्योजक यांच्याकडे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यात आली होती. उमेदवारांना प्रशिक्षण देऊन औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामांद्वारे प्रशिक्षण, गरजु युवकांना रोजगाराची संधी, तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी पुर्वी ६ महिन्यांचा होता मात्र आता कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ११ महिने करण्यास महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने मान्यता दिली आहे.
या योजनेंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून ११ महिने असा असेल. तसेच, ज्या उमेदवारांचा ६ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पुर्ण झाला आहे, अशा उमेदवांराना पुढील ५ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येणार आहे. या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून ५ महिन्याचा कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय असणार आहे.
या योजनेंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या उमेदवारांचे संबंधित आस्थापनेत तसेच आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना/कार्यालयात यापुर्वी कधीही कायम/तात्पुरता स्वरुपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच, कुठलाही हितसंबध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी सबंधित आस्थापनेत सादर करणे अनिवार्य राहील. संबधित आस्थापनेनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना/कार्यालयात कायम/तात्पुरता स्वरुपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील. हे दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आत संबंधित सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या कडे सादर करणे अनिवार्य राहील. तसेच, पुढील ५ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होण्याकरीता उमेदवारांना दिनांक ३० एप्रिल २०२५ पुर्वी संबंधित आस्थापनेत रुजु होण्याकरीता सुचित करावे.
याबाबत काही अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ०९.४५ ते सांयकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहऩ संदीप ज्ञा. गायकवाड सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम