
मुख्यमंत्र्यांच्या बनावट सहीचे जॉइनिंग लेटर देऊन तरुणीची फसवणूक
मुख्यमंत्र्यांच्या बनावट सहीचे जॉइनिंग लेटर देऊन तरुणीची फसवणूक
चाळीसगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट रुजू पत्र देत मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायगाव येथील एका भागात राहणाऱ्या तरुणीला मुंबई मंत्रालयात लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. तिच्या नावे तयार करण्यात आलेले जॉइनिंग लेटर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर व सहीसह दिले गेले. त्यामुळे हे पत्र खरे वाटून तिने विश्वास ठेवला.
मात्र नातेवाईकांनी अधिक माहिती घेतली असता लक्षात आले की, अशा नियुक्ती पत्रांवर मुख्यमंत्री नव्हे तर संबंधित सचिव अथवा विभागप्रमुख यांचीच सही असते. संशय बळावल्यावर तरुणीने मुख्य आरोपी सर्वेश प्रमोद भोसले याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उघड केले की त्याने पुण्यातील खडकी येथील स्वामी ग्राफिक्सवर रणजीत मांडोळे यांच्या मदतीने इंटरनेटवरून “CM officer letter Maharashtra” असे शोधून मिळालेल्या फॉर्मेटवर बनावट मजकूर तयार केला आणि मुख्यमंत्र्यांची खोटी सही वापरून ते पत्र तयार केले.
या फसवणुकीत तिसरा आरोपी तुषार उर्फ रोहित मधुकर बेलदार याचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम