
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संवेदनशीलतेमुळे तब्बल सात वर्षांनंतर पीडित महिलेला मिळाला न्याय
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संवेदनशीलतेमुळे
तब्बल सात वर्षांनंतर पीडित महिलेला मिळाला न्याय
जळगाव | दि. १९ डिसेंबर २०२५ : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत पंचायत समिती जामनेर येथील जिल्हा परिषद शाळा बेटावद (ता. जामनेर) येथे कार्यरत असलेले शिक्षक कै. प्रमोद पंडित वंजारी यांचे २२ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर पत्नी व कुटुंबीयांना मिळणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनासह अन्य शासकीय लाभांचा प्रस्ताव विविध प्रशासकीय अडचणींमुळे तब्बल सात वर्षे प्रलंबित राहिला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे अखेर या पीडित महिलेला न्याय मिळाला आहे.
कै. प्रमोद वंजारी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मूळ सेवा पुस्तक गहाळ झाल्याने कुटुंब निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव अडकून पडला होता. या अन्यायाबाबत मयत शिक्षकांच्या पत्नी व सासरे यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडे व्यथा मांडली. या तक्रारीची तात्काळ दखल घेत करनवाल यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या व सातत्याने पाठपुरावा सुरू केला.
दरम्यान, मयत शिक्षकांचे दुय्यम सेवा पुस्तक सादर करण्यात आले. मात्र त्यामध्ये अनेक नोंदी अपूर्ण होत्या. प्रमोद वंजारी हे हयात असताना काही काळ नाशिक जिल्ह्यात कार्यरत असल्याने संबंधित नोंदी तेथून पूर्ण करणे आवश्यक होते. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी थेट नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने आवश्यक नोंदी पूर्ण केल्या.
यानंतर परिपूर्ण कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जामनेर यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला. शिक्षण विभागाने त्याच दिवशी प्रस्ताव पुढे पाठवत ६ ऑक्टोबर २०२५ रोजी अर्थ विभागाकडे तो सादर केला. मात्र मूळ सेवा पुस्तकात स्थायी आदेश तसेच हिंदी-मराठी भाषा सूटची नोंद व कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने १७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रस्ताव त्रुटी पूर्ततेसाठी परत करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम