मुलाला अटक झाल्यानंतर वडिलांची आत्महत्या; भोकर गावात खळबळ

बातमी शेअर करा...

मुलाला अटक झाल्यानंतर वडिलांची आत्महत्या; भोकर गावात खळबळ

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील भोकर गावात रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) सायंकाळी एका शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्माराम प्रल्हाद सपकाळे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाला एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आत्महत्येचा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम सपकाळे हे आपल्या कुटुंबासह भोकर येथे वास्तव्यास होते. शेतीच्या कामातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सपकाळे हे रविवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेले. काही वेळाने त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना खाली उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

मुलाला दोन दिवसांपूर्वी झाली होती अटक

गावात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका वादप्रकरणी दोन अल्पवयीनांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आत्माराम सपकाळे यांचा मुलगा हर्षल (वय २२) हा संशयित ठरला असून, पोलिसांनी त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. मुलाच्या अटकेनंतर वडिलांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

आत्माराम सपकाळे हे शांत, मनमिळाऊ आणि साध्या स्वभावाचे असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीय व नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने भोकर गावात हळहळ व्यक्त केली जात असून, याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तालुका पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम