
मुलीकडे गेलेल्या वृद्धेच्या बंद घरात चोरट्यांची घरफोडी
मुलीकडे गेलेल्या वृद्धेच्या बंद घरात चोरट्यांची घरफोडी
रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव ─ पिंप्राळा येथील सुतारवाडा परिसरात राहणाऱ्या प्रमिलाबाई साहेबराव चौधरी (वय ६५) यांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला टाकत ६३ हजार रुपये किंमतीचे सोन्या–चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, प्रमिलाबाई चौधरी यांचा मुलगा पुण्यात नोकरीसाठी स्थायिक आहे. त्या १७ नोव्हेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील सोनगिर येथील मुलीकडे गेल्या होत्या. दरम्यान २९ नोव्हेंबरला सकाळी नऊच्या सुमारास शेजारीण तुळसाबाई पाटील यांनी घराचा कडीकोयंडा तुटलेला असल्याचे फोनवरून कळवले. तत्काळ त्या सोनगिरहून जळगावकडे रवाना झाल्या.
घरी परतल्यावर त्यांनी पाहिले असता घराचा कडीकोयंडा तुटलेला, कुलूप बाजूला पडलेले व हॉलसह बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. किचनमधील लोखंडी पेटी तोडून त्यामधील सोन्या–चांदीचे दागिने व थोडीफार रोकड चोरट्यांनी पळविल्याचे स्पष्ट झाले.
चोरीची खात्री झाल्यानंतर प्रमिलाबाई यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, पुढील कार्यवाही पोहेकॉ जितेंद्र राजपूत करत आहेत.
चोरट्यांनी घरातून ८ ग्रॅमचे सोन्याचे टोंगल, ६ ग्रॅमच्या साखळ्या, १ ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या, ५० भार पाटल्या आणि ४० भार चांदीचे गोट असा मिळून ६३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम