
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या दोन महिलांची सोनसाखळी हिसकावली
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद; पोलिसांचा तपास सुरू
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या दोन महिलांची सोनसाखळी हिसकावली
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद; पोलिसांचा तपास सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी (दि. १ मे) सकाळी घडली. या दोन्ही प्रकारांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरीचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पहिली घटना प्रेमनगर येथील मंदिराजवळ सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पूजा मनोज चांडक (वय ४२, रा. प्रेमनगर) यांच्यासोबत घडली. एक चोरटा पायी येत त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून लगेचच दुचाकीवर बसून पसार झाला.
त्यानंतर काही वेळातच फॉरेस्ट कॉलनीजवळील रस्त्यावर संगीता राजेश कडे (वय ५२, रा. बहिणाबाई बगीचाजवळ) यांच्या गळ्यातील सुमारे ₹५०,००० किमतीची सोनसाखळी अशाच पद्धतीने चोरट्यांनी लंपास केली.
चोरटे सीसीटीव्हीत स्पष्ट, दुचाकी क्रमांक अस्पष्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही घटनांमध्ये एकाच टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसून येत असून, दुचाकीचा क्रमांक धूसर असल्याने अडचणी येत आहेत. पोलीस सध्या आरोपींचा माग काढत असून, तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या घटनांमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, पोलिसांनी नागरिकांना मॉर्निंग वॉक दरम्यान सतर्क राहण्याचे आणि मौल्यवान दागिने न घालण्याचे आवाहन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम