
मोटारसायकल चोरटा एलसीबीच्या जाळ्यात
मोटारसायकल चोरटा एलसीबीच्या जाळ्यात
तीन गुन्हे उघड; तीन दुचाकी हस्तगत, मध्यप्रदेशातील आरोपीला शिरपूरमधून अटक
जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरात वाढत चाललेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत एका सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, शहरातील तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्वतंत्र तपास पथक गठित करून मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू केला होता. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, पोलीस हवालदार संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोळी तसेच चालक पोलीस हवालदार दिपक चौधरी यांचे पथक सातत्याने संशयितांवर लक्ष ठेवून तपास करत होते.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपास पथकाने शिरपूर परिसरातून विकास चंपालाल बरडे (रा. अंजनगाव, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) या संशयित आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने जळगाव शहरातील विविध भागांतून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
त्याच्या कबुलीच्या आधारे अभिलेखांची तपासणी केली असता जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नं. ३९०/२०२५ व ३८२/२०२४ तसेच रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नं. १५/२०२५ (BNS ३०३(२)) असे एकूण तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. या तिन्ही गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली आरोपीकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपीस पुढील तपासासाठी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार उमेश भांडारकर करीत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम