मोठी बातमी : राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींची निवडणूक; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

बातमी शेअर करा...

मोठी बातमी : टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींची निवडणूक; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

मुंबई प्रतिनिधी │ राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर घोषणा करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदान २ डिसेंबर रोजी होणार असून, मतमोजणी व निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यासह राज्यभरात ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगरपंचायती, ३३६ पंचायत समित्या आणि २४६ नगरपालिकांची मुदत संपली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून, राज्यातील १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावतील. त्यासाठी राज्यात १३ हजार ३५५ मतदान केंद्रांसह १३ हजार कन्ट्रोल युनिट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

विभागनिहाय पाहता कोकण विभागात १७, नाशिकमध्ये ४९, पुण्यात ६०, संभाजीनगरमध्ये ५२, अमरावतीत ४५ आणि नागपूर विभागात ५५ अशा एकूण २४६ नगरपरिषदांच्या तसेच ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये १० नवनिर्मित आणि २३६ मुदत संपलेल्या नगरपरिषदा, तर १५ नवनिर्मित आणि २७ मुदत संपलेल्या नगरपंचायतींचा समावेश आहे.

या निवडणुकीत एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवडले जाणार असून, यंदा उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख, तर क वर्ग नगरपालिकांसाठी ७ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होणार असून, उमेदवारी अर्ज पोर्टलवर भरल्यानंतर त्याची प्रिंट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावी लागणार आहे. एका प्रभागासाठी उमेदवाराला अधिकाधिक चार अर्ज दाखल करण्याची परवानगी असेल. तसेच प्रत्येक उमेदवारासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, अर्ज प्रक्रियेत पावती स्वीकारली जाईल.

मतदारांच्या सोयीसाठी ईव्हीएम प्रणालीचा वापर होणार असून, मतदार याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. आयोगाने मतदारांसाठी विशेष मोबाईल अॅप आणि ‘सर्च फॅसिलिटी’ उपलब्ध करून दिली आहे. दुबार मतदार ओळखण्यासाठी ‘डबल स्टार’ चिन्ह दाखवले जाणार असून, अशा मतदारांकडून दुसऱ्या ठिकाणी मतदान न करण्याचे जाहीर लेखी निवेदन घेतले जाईल.

मतदान केंद्रांवर दिव्यांग, गरोदर महिला, तान्ह्या बाळांसह आलेल्या महिलांसाठी तसेच ज्येष्ठांसाठी स्वतंत्र सुविधा असणार आहेत. गुलाबी मतदान केंद्रांवर पूर्णतः महिला कर्मचारीच काम पाहतील. मतदान केंद्रावर मोबाईल वापरास सक्त मनाई असेल.

नगरपरिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने पार पडतील, तर नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी एक सदस्य आणि अध्यक्षाची निवड होणार आहे.

या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चैतन्यमय झाले असून, आगामी आठवड्यांत सर्वच पक्षांकडून उमेदवार निवड, प्रचार आणि तिकीटवाटपाच्या हालचालींना वेग येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम