
यारा इंडिया आणि केळी संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘केळी मूल्य साखळी संमेलन 2025’ जळगावमध्ये आयोजन
यारा इंडिया आणि केळी संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘केळी मूल्य साखळी संमेलन 2025’ जळगावमध्ये आयोजन
सावदा – यारा इंटरनॅशनलची सहाय्यक कंपनी असलेल्या यारा इंडिया, जगातील आघाडीची पीक पोषण संस्था आणि केळी संशोधन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘केळी मूल्य साखळी संमेलन 2025’ चे आयोजन करण्यात आले. “उत्पादकतेपासून समृद्धीकडे – केळी मूल्य साखळी बळकट करणे” या संमेलनाच्या संकल्पनेनुसार भारतातील केळी लागवडीसमोरील महत्त्वाच्या समस्यांवर विचारमंथन करताना, नाविन्यपूर्ण उपाययोजना, सहकार्य आणि मूल्यवर्धनाला चालना देण्यावर भर देण्यात आला.
महाराष्ट्रातील प्रमुख केळी उत्पादक पट्ट्यातील 500 हून अधिक शेतकरी, आघाडीचे शास्त्रज्ञ, व्यापारी, प्रक्रिया उद्योगातील तज्ज्ञ, निर्यातदार, कोल्ड चेन तज्ज्ञ, कृषी संस्था, व्यापारी मंडळे आणि कृषी शास्त्रज्ञ यांना एकत्र घेऊन हे एक दिवसीय संमेलन पार पडले. केळी शेतीची उत्पादकता, लवचिकता आणि बाजारपेठेतील पोहोच यामध्ये वाढ करताना शेतकरी-केंद्रित उपाय आणि उद्योग–शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं.
या संमेलनात विविध तांत्रिक सत्रं आणि पॅनल चर्चांचा समावेश होता, जिथे हवामान स्नेही शेती पद्धती, काढणीपश्चात व्यवस्थापन, दर ठरवण्याची यंत्रणा आणि शाश्वत शेती यासारख्या विषयांवर चर्चा झाली.
शेतकऱ्यांनी स्वत:चे अनुभव, अडचणी आणि यशोगाथा मांडत जमिनी पातळीवरील दृष्टीकोन समोर मांडला. संशोधन संस्थांकडून विकसित केलेल्या नवीन केळी जातींचं प्रदर्शन, आणि मूल्यवर्धित केळी उत्पादने यांच्या प्रदर्शनाने केळीच्या आर्थिक व पौष्टिक मूल्याला अधोरेखित केलं.
श्री कुर्बान मुराद तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी सांगितले – “केळी संशोधन केंद्र व यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘केळी मूल्य साखळी संमेलन’ हे जळगावसाठी गौरवाचं ठिकाण आहे. ही एक ऐतिहासिक पायरी असून आमच्या जिल्ह्यातील केळी उत्पादकांना नव्या युगात नेणारा टप्पा ठरेल. इथे निर्माण झालेल्या संधी, ज्ञान आणि भागीदारी यांमुळे शेतकऱ्यांना अधिक समृद्ध करणारी दिशा मिळेल. यामुळे ना केवळ उत्पादनक्षमता वाढेल, तर नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि आहार-सुरक्षेसह आर्थिक विकासालाही गती मिळेल.”
संजिव कांवर, व्यवस्थापकीय संचालक, यारा साउथ एशिया यांनी सांगितलं – “केळी मूल्य साखळीतले विविध घटक एकत्र आणण्यासाठी केळी संशोधन केंद्राच्या भागीदारीने हे संमेलन आयोजित करणं आमच्यासाठी अभिमानाचं आहे. शाश्वत तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि ज्ञानवाढीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे आमचं प्रमुख ध्येय आहे. भारतीय बागायती क्षेत्रात केळी एक महत्त्वाचं पीक आहे – आणि आता फक्त ‘जास्त उत्पादन’ नव्हे तर ‘चांगलं उत्पादन आणि चांगलं उत्पन्न’ यासाठीचं समर्थन करणं आवश्यक आहे.”
डॉ. अरुण भोसले, उद्यानतज्ज्ञ हे मत व्यक्त करताना म्हणाले, “संशोधन संस्था आणि कृषी उद्योग यांच्यातील भागीदारीतूनच शेतकऱ्यांना बळ मिळतं. आजच्या संमेलनातून आम्ही शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, बाजारपेठेची माहिती आणि नवीन संधी मिळवण्यासाठी सक्षम करू इच्छितो.”
यावेळी यारा फर्टीलायझरचे झोनल हेड भान सिंग, चिफ ऍग्रोनॉमिस्ट राजीव मिश्रा,रिजनल ऍग्रोनॉमिस्ट विकास घुमरे, कमयुनिकेशन प्रमुख वैशाली चोप्रा, कमयुनिकेशन मॅनेजर वनिषा विज उपस्तित होते.
या संमेलनाचा समारोप यारा इंडिया आणि केळी संशोधन केंद्राच्या शेतकऱ्यांबरोबर आणि संपूर्ण उद्योग क्षेत्राबरोबर दृढ सहकार्य ठेवण्याच्या संकल्पाने झाला. अर्थपूर्ण, टिकाऊ आणि भविष्यातील गरजांना साजेसं असं केळी मूल्य साखळी इकोसिस्टीम भारतात निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे!

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम
