
यावल तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केले गंभीर आरोप
यावल तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केले गंभीर आरोप
यावल : रेशनकार्ड मिळवण्यासाठी यावल तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना दलालांच्या जाळ्यात अडकवून आर्थिक लुट केली जात असल्याचा आरोप आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केला आहे. मोफत मिळणाऱ्या रेशनकार्डासाठी दोन-दोन हजार रुपये उकळले जात असून, स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सेवा हक्क दिनानिमित्त यावल पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत आमदार सोनवणे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “गरीब लाभार्थ्यांच्या नावे असलेले पिवळे रेशनकार्ड अनेक श्रीमंत लोकांकडे आहेत. याची तातडीने चौकशी करून अपात्र व्यक्तींची नावे वगळावीत. तसेच, तहसील कार्यालयात दलालांमार्फत होणाऱ्या आर्थिक लुटीवर त्वरित अंकुश आणावा.”
स्वस्त धान्य दुकानांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी रोष व्यक्त केला. “वितरणासाठी येणाऱ्या धान्यापैकी अर्ध्याहून अधिक धान्य साठवून काळ्या बाजारात विकले जात आहे. तालुका पुरवठा अधिकारी अभिमन्यु चराटे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” असे आदेशही त्यांनी बैठकीत दिले.
या बैठकीस तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे), आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार सोनवणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर केलेल्या गंभीर आरोपांमुळे यावल तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आता तालुका पुरवठा विभाग या आरोपांची चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम