यावल तालुक्यात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी घेतली अधिकाऱ्यांची  झाडाझडती

घरकुल, पाणीपुरवठा, स्वच्छता, पुरवठा यंत्रणा, कृषी विभागाच्या अकार्यक्षमतेवर तीव्र नाराजी; पुढच्या महिन्यात थेट दौऱ्याचा इशारा

बातमी शेअर करा...

यावल तालुक्यात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी घेतली अधिकाऱ्यांची  झाडाझडती

घरकुल, पाणीपुरवठा, स्वच्छता, पुरवठा यंत्रणा, कृषी विभागाच्या अकार्यक्षमतेवर तीव्र नाराजी; पुढच्या महिन्यात थेट दौऱ्याचा इशारा

यावल (प्रतिनिधी) – चोपडा-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली यावल पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच यावल तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. बैठकीत अनेक योजनांच्या कामकाजाबाबत झालेल्या कुचराईवर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

 

घरकुल योजनेंतर्गत केवळ ७५ टक्के काम:
आमदारांनी 2020 पासून घरकुल योजनेचे केवळ ७५% काम झाल्याची आकडेवारी समोर ठेऊन अधिकाऱ्यांना फटकारले. लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा उल्लेख करत, त्यांनी या प्रकारांना खपवून न घेण्याची तंबी दिली.

स्वच्छ भारत मिशन आणि समाजकल्याण योजनांवर प्रश्नचिन्ह:
स्वच्छ भारत अंतर्गत शौचालयांच्या रखडलेल्या कामावर प्रश्न उपस्थित करत समाजकल्याण विभागाच्या योजनांचीही सखोल चौकशी केली.

कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागावर नाराजी:
बियाण्यांचे दर अधिक आकारले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत कृषी अधिकाऱ्यांना कामात पारदर्शकता पाळण्याचे आदेश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागाकडून उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने ‘नियमानुसार काम करा’ असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणावर संताप:
नागादेवी आणि जामुनझिरा या गावांना पाणी न मिळाल्याच्या तक्रारींवर संतप्त प्रतिक्रिया देत संबंधित अभियंत्यांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पुरवठा विभागात गैरप्रकारांचा आरोप:
दोन हजार रुपये लाच घेऊन धान्य वितरण सुरू केल्याचे आरोप बैठकीत खुलेपणाने मांडले गेले. दुकानांवर सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश देत, गरजू लाभार्थ्यांना वेगळे कार्ड देऊन धान्य मिळवून देण्यावर भर देण्यात आला.

गावठी दारू विक्री व केबल चोरीविरोधात कारवाईची मागणी:
पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत, गावात सर्रास होणाऱ्या हातभट्टी विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. तसेच, केबल चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचना करण्यात आली.

रस्त्यांची अवस्था आणि बौद्ध विहारांची कामे:
गावो-गाव रस्त्यांवर काटेरी झाडझुडपे हटवण्याचे आदेश देण्यात आले. अपूर्ण बौद्ध विहारांची कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचा स्पष्ट निर्देश दिला.

‘मी स्वतः दौऱ्यावर’: आमदारांचा इशारा
“पुढील महिन्यात मी स्वतः तालुक्यात फिरून शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या तक्रारी ऐकून घेणार आहे. अधिकारी जर कामचुकार ठरले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही कोणाचे वैरी नाही, पण जनतेच्या कामासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतात,” असे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी ठामपणे सांगितले.

बैठकीस उपस्थित अधिकारी:
या आढावा बैठकीला तहसीलदार मोहन माला नाझीरकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, गटविकास अधिकारी डॉ. मंजुष्री गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जहांगीर तडवी, यावल एसटी डेपो व्यवस्थापक डी. बी. महाजन, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.


 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम