यावल तालुक्यात बिबट्याचा हल्ला ;७ वर्षीय बालक ठार, नागरिकांमध्ये संताप

बातमी शेअर करा...

यावल तालुक्यात बिबट्याचा हल्ला ;७ वर्षीय बालक ठार, नागरिकांमध्ये संताप

आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बालकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची विधानसभेत केली मागणी

यावल (प्रतिनिधी) : आईसोबत चालणाऱ्या ७ वर्षीय चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून त्याला ओढून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ६ मार्च) दुपारी घडली. या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान साकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय
केशा प्रेमा बारेला या बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज विधानसभा सभागृहात पॉइंट ऑफ इन्फोर्मेशनद्वारे शासनाचे लक्ष वेधले.तसेच मृत बालकाच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी यावेळी सभागृहात आ . प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केली.

 

आईच्या हातातून चिमुकल्याला फरपटत नेले

मृत बालकाचे नाव केशा प्रेमा बारेला (वय ७, रा. मानकी, साकळी) असे आहे. तो आपल्या आईसोबत जात असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून त्याला फरपटत नेले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

परिसरात भीतीचे वातावरण, वन विभागावर संताप

या घटनेमुळे किनगाव, साकळी परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिक आणि आदिवासी बांधवांमध्ये वन विभागाच्या दुर्लक्षामुळे रोष निर्माण झाला असून, बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबाबत योग्य उपाययोजना होत नाहीत, अशी टीका होत आहे.

घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी यावल पश्चिम वन विभागाचे वनक्षेत्रपाल सुनील भिलावे आणि जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक (यावल प्रादेशिक) जमीर शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे वन विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांनी उपाययोजनांची मागणी केली

सातपुडा पर्वतरांगांलगत असलेल्या गावांमध्ये वारंवार बिबट्यांचे हल्ले होत आहेत. मात्र, वन विभागाकडून जनजागृती आणि सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

यावल, रावेर आणि चोपडा तालुक्यातील नागरिकांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम